पाच राज्यांतील १३६ शाखांतील कामकाज करोनाकाळातही गतिमान ठेवणाऱ्या टीजेएसबी सहकारी बँकेने एकूण व्यवसायात १७ हजार कोटींचा टप्पा ओलांडला असून, तो मार्च २०२० अखेर १७,०१६ कोटी रुपये नोंदविला आहे. टाळेबंदी संपूर्णत: उठण्यापूर्वी २०१९-२० चा ताळेबंद घोषित करणारी टीजेएसबी ही एकमेव सहकारी बँक आहे.

महामारीने ओढवलेल्या आर्थिक संकटातही चार टक्के वृद्धी करण्यात बँक यशस्वी झाली आहे. एकूण व्यवसायाअंतर्गत, बँकेच्या ठेवी ११,३७४ कोटी रुपये, तर कर्ज व्यवहार ५,६४२ कोटी रुपयांचा झाला आहे. यंदाच्या वर्षी बँकेला १९८ कोटी रुपयांचा ढोबळ नफा झाला असून, तर निव्वळ नफा १२० कोटी रुपये झाला आहे. (वर्ष २०१८-१९ मध्ये बँकेचा ढोबळ नफा २२३ कोटी रुपये तर, निव्वळ नफा १४० कोटी रुपये इतका होता.) यंदाच्या वर्षी बँकेची अनुत्पादित कर्जाचे प्रमाण ५.८६ टक्के इतकी म्हणजे ३३० कोटी रुपये इतके आहे. गेल्या वर्षी अनुत्पादित कर्ज ४.६७ टक्के इतकी होती.

बँकेने यावर्षी संतुलित वृद्धीवर भर दिला, त्यामुळे स्वनिधीमध्ये १,१०८ कोटी रुपयांवरून, १,१९१ कोटी रुपये अशी ८३ कोटींची घसघशीत वाढ झाली, असे ताळेबंद घोषित करताना टीजेएसबी बँकेचे अध्यक्ष विवेकानंद पत्की यांनी नमूद केले. बँकिंग व्यवसायासमोर भांडवल उभारणीचे मोठे आव्हान असताना, टीजेएसबीने सातत्यपूर्ण नफ्याच्या बळावर भांडवल पर्याप्तता प्रमाणात (सीआरएआर) ०.१५ टक्के वाढ नोंदवून ते १५.३८ टक्क्यांवर नेले आहे. करोना आपत्तीत बँकेची तंत्रज्ञानपूरक सेवा ग्राहकांसाठी मोठी उपकारक ठरली, असे बँकेचे कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील साठे यांनी सांगितले. ‘स्वयं, स्फूर्ती आणि सहयोग’ या तीन डिजिटल सुविधा बँकेने ग्राहकांसाठी सुरू केल्या आहेत.