दसऱ्याच्या निमित्ताने नागरिकांना वाहन बाळगण्याचे स्वप्न पूर्ण करता यावे, या उद्देशाने टीजेएसबी सहकारी बँकेने फायनान्शियल एक्स्पो आणि ऑटो मेळा आयोजित केला आहे. ठाणे, मुलुंड, नाशिक, पुणे, बदलापूर, शहापूर, कल्याण या शहरांमध्ये हा मेळा होणार असून त्यामध्ये वाहन निर्माते, दुचाकींचे आघाडीचे ब्रँडस्, नामवंत सहल आयोजक संस्था सहभाग घेणार आहेत. तसेच या मेळ्यात ग्राहकांना आपल्या पसंतीचे वाहन खरेदी करणे शक्य व्हावे यासाठी शंभर टक्के वाहन कर्जसाहाय्याची संधीही मिळणार आहे.
राज्यातील विविध शहरांमध्ये १६ ते १८ या कालावधीत टीजेएसबी सहकारी बँकेचा फायनान्शियल एक्सपो आणि ऑटो मेळा होणार असून या मेळ्याचे उद्घाटन शुक्रवारी १६ ऑक्टोबरला दुपारी चार वाजता ठाणे येथील सेंट्रल मैदानाजवळील पोलीस परेड मैदान येथे होणार आहे. रविवार, १८ ऑक्टोबरला रात्री आठ वाजेपर्यंत हा मेळा सुरू राहणार आहे. नाशिक येथील बी.बी.वाय.के. कॉलेज समोरील मोकळ्या मैदानात सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत मेळा सुरू राहणार आहे. पुणे येथील आकुर्डी भागातील शेंबेकर इंडस्ट्रीज कम्पाऊंड आणि कर्वे रोड भागातील सेंट क्रिस्पिन्स होम येथे सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत मेळा होणार आहे. मुलुंड जिमखाना भागात १७ व १८ ऑक्टोबर या कालावधीत सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत मेळा होणार आहे. त्याचप्रमाणे बदलापूर, शहापूर, कल्याण (खडकपाडा) भागातही अशा प्रकारे मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
मेळाव्याच्या ठिकाणी कोणतेही प्रक्रिया शुल्क न आकारता १०० टक्के वाहन कर्जाची सुविधा बँक देणार आहे. तसेच कमीत-कमी सुलभ हफ्त्यांमधून कर्ज परतफेडीची सोय केली आहे, अशी माहिती टीजेएसबीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी सतीश उतेकर यांनी दिली. सणासुदीच्या निमित्ताने अधिकाधिक ग्राहकांनी हक्काच्या वाहनाचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.