करोना व्हायरसच्या पार्श्वभूमी सामान्यांना दिलासा देण्यासाठी आयकर विभागानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार आयकर विभागानं ५ लाख रूपयांपर्यंतचा आयकर रिफंड त्वरित मिळणार आहे. आयकर विभागानं आपल्या ट्विटरवर याबाबत माहिती दिली. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे करदात्यांना दिलासा देण्यासाठी सरकारनं ५ लाख रूपयांपर्यंतचा रिफंड, जीएसटी आणि कस्टम रिफंड त्वरित देण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे देशातील १४ लाख करदात्यांना तात्काळ याचा लाभ मिळणार आहे. नोकरी गमावणारे किंवा वेतन कपाताची झळ सोसणाऱ्यांसाठी सरकारचा हा निर्णय थोडा दिलासा देणारा ठरू शकतो. ज्यांच्या उत्पन्नावर कर घेतला जातो, परंतु इन्कम टॅक्स फाईल रिटर्न करताना गुंतवणूक दाखवल्यास कापण्यात आलेली काही रक्कम नियमांनुसार परत करण्यात येते.

पूर्ण वर्षाचं उत्पन्न, गुंतवणूक आणि त्यावर कापण्यात आलेला टॅक्स यांच्या आकडेमोडीच्या आधारावर आयकर विभागाकडून आयटीआर रिफंड देण्यात येतो. टॅक्स रिटर्न केल्यानंतर आयकर विभाग करदात्यांच्या खात्यात रिफंडची रक्कम ट्रान्सफर करत असतात. अनेकदा यामध्ये एक महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लागतो.