देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना उद्योग क्षेत्रात होणाऱ्या करारांचे उत्सवीकरण होत होते. ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’सारख्या गुंतवणूक मेळ्यतून, कंपन्यांचा ताळेबंदही न पाहता करार होत असत. त्यामुळे गुंतवणुकीच्या घोषणा होत, प्रत्यक्षात त्यापैकी मोजक्याच फलद्रुप होत असत. आता महाविकास आघाडीच्या काळात उद्योग गुंतवणुकीचे उत्सवीकरण पूर्णत: थांबविले असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या काळात उद्योगमंत्री म्हणून काम करणे आणि महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात त्याच खात्याचा कारभार सांभाळताना नक्की काय बदल जाणवतात, असे विचारले असता सुभाष देसाई म्हणाले, की पूर्वी गुंतवणुकीचे करार करताना उत्सवीकरण होत असे. मग अधिकारी उद्योजकांच्या करारावर सह्य़ा घ्यायचे. अर्थात सरकारला आम्ही खूप काही अधिक करत आहोत असे भासवायचे होते.

उद्योगमंत्री म्हणून मला ते करावे लागले. पण तेव्हा उद्योजकांची मानसिकता उद्योग थाटण्याची आहे की नाही, त्याची क्षमता आहे की नाही, कोटय़वधीचे करार करणाऱ्या उद्योजकाच्या बँक खात्यात रक्कम किती, ताळेबंद काय, हे न पाहताच अधिकारी पुढे पुढे जात. आता हे उत्सवीकरण पूर्णत: थांबविण्यात आले आहे. झालेले करार अंमलबजावणीमध्ये येतीलच याची खातरजमा केली जात असल्याचेही ते म्हणाले.

पूर्वी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विषय आला की ‘नेक्स्ट’ असे म्हटले जायचे. फडणवीस यांची ती स्टाईल होती. आता मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वाना बोलू देतात. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठका तीन-चार तासापर्यंत चालतात, असेही सुभाष देसाई एका प्रश्नाच्या उत्तरादाखल म्हणाले.