News Flash

सोनं महागलं : दोन दिवसांत १८०० रूपयांनी वाढला भाव, जाणून घ्या आजचा दर

सोने व चांदीच्या भावात आता पुन्हा अमेरिका व इराणमधील तणावामुळे मोठी भाववाढ झाली

सोनं

आधीच उच्चांकावर पोहोचलेल्या सोने व चांदीच्या भावात आता पुन्हा अमेरिका व इराणमधील तणावामुळे मोठी भाववाढ झाली आहे. दोन देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सर्वच ठिकाणाच्या बाजारपेठांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. स्थानिक बाजारपेठ असो किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, सोन्याच्या दरांत वाढ होताना दिसत आहे. मागील दोन दिवसांत सोन्याच्या दरांत प्रति दहा ग्राम (तोळा) १८०० रूपयांची वाढ झाली आहे. वर्षाच्या सुरूवातीला एक जानेवारी रोजी सोनं प्रति तोळा ३९ हजार ५00 रुपये होते. दोन जानेवारीला १00 रुपयांनी वाढून ते ३९ हजार ६00 रुपये प्रति तोळा झाला.

शुक्रवारी सोन्याच्या दरांत प्रति तोळा ८५० रूपयांनी वाढ झाली होती. आठवड्याच्या सुरूवातीलाच सोमवारी सोन्याच्या भावात पुन्हा वाढ झाली आहे. शुक्रवारी दोन टक्क्यानं वधारलेलं सोनं सोमवारी पुन्हा महागलं आहे. सोमवारी गोल्ड मार्केट सुरू झाल्यानंतर साेने प्रति तोळा ४१ हजार रुपयांच्याही पुढे गेले होते. त्यानंतर दिवसअखेर सोन्याचा भाव प्रति तोळा ४०,९३९ रूपये असा स्थिर झाला. गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याचे दर सतत वाढताना दिसत आहेत. सोन्यासोबतच चांदीच्या दरानेही गगनभरारी घेतली आहे. भारतात चांदीचा भाव प्रति किलो ५१,०४२.०० रूपये होता.

सोने-चांदीचे भाव वाढण्याचे नेमके कारण काय?
दोन दिवसांत १८०० रुपयांना सोने महाग होण्यामागे इराण-अमेरिका यांच्यातील तणावाची स्थितीचे कारण आहे. अमेरिकेने इराणमध्ये केलेले हल्ला आणि त्यानंतर चिघळत गेलेली परिस्थिती पाहता गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळू लागले आहेत. सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित समजली जाते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची आणि चांदीचीही मागणी वाढली आहे. मागणी वाढली म्हणून भावही वाढले. येत्या काळात दोन्ही देशांतील स्थिती सुधारली नाही तर सोने-चांदीचे भाव आणखी वाढतील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

पेट्रोल-डिझेलही महागण्याची शक्यता
अमेरिका-इराणमधील नव्या संघर्षांमुळे खनिज तेलाच्या किमतीचा भडका उडाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमती जवळपास तीन टक्क्यांपर्यंत वाढल्या. परिणामी खनिज तेलाने पुन्हा एकदा प्रति पिंप ७० डॉलरचा टप्पा पार केला आहे. लंडनबरोबरच अमेरिकेच्या बाजारातील खनिज तेलाच्या किमतीही वाढू लागल्या आहेत. परिणामी पुढील काही दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीतही आणखी वाढ होऊ शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2020 4:36 pm

Web Title: today gold rate global rates amid us iran tensions nck 90
Next Stories
1 अमेरिका-इराण तणावामुळे शेअर बाजार आपटला, तीन लाख कोटींचा फटका
2 अमेरिका-इराण संघर्षांचे पडसाद ; डॉलर भक्कम-कच्चे तेल महाग
3 बाजार-साप्ताहिकी : बाजाराची चिवट चाल
Just Now!
X