उणे १० टक्क्य़ांच्या अधोगतीचा अर्थविश्लेषकांचा कयास

भारताच्या अर्थव्यवस्थेने टाळेबंदीतील शिथिलतेनंतर दमदार उभारीचा प्रत्यय दिला असून, त्याचे प्रतिबिंब जुलै ते सप्टेंबर या आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीतील सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात ‘जीडीपी’मधील वाढीच्या शुक्रवारी जाहीर केल्या जाणाऱ्या आकडेवारीतही उमटताना दिसणे अपेक्षित आहे. एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत भारताच्या अर्थव्यवस्थेत उणे २३.९ टक्क्य़ांची अधोगती दिसून आली होती, दुसऱ्या तिमाहीत मात्र अर्थव्यवस्थेतील आकुंचनाचे प्रमाण घटण्याची अपेक्षा केली जात आहे.

अर्थविश्लेषकांच्या कयासाप्रमाणे जुलै-सप्टेंबर तिमाहीत देशाच्या अर्थव्यवस्थेत नकारात्मक कल कायम राहील आणि उणे पाच टक्के ते कमाल उणे १२.७ टक्के या दरम्यान ती आकुंचन पावल्याचे दिसून येईल. अर्थसंकोच उणे १० टक्क्य़ांच्या मर्यादेत जरी राहिला तरी जागतिक स्तरावरील २४ उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारत ही सर्वात धीम्या गतीने वाढत असलेली अर्थव्यस्था ठरेल. पहिल्या तिमाहीतील उणे २३.९ टक्क्य़ांची विकासदराची पातळी ही करोनाचा घाव सोसाव्या लागलेल्या जी-२० राष्ट्रगटातील सर्वात दारुण स्थिती दर्शविणारी होती.

शुक्रवारी केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून जाहीर होत असलेल्या बहुप्रतीक्षित आकडेवारीबाबत वेगवेगळे कयास व्यक्त केले जात आहेत. बँक ऑफ अमेरिकेच्या मते भारतीय अर्थव्यवस्था सरलेल्या तिमाहीत ७.८ टक्क्य़ांनी आक्रसलेली दिसेल, तर नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च (एनसीएईआर)च्या मते आकुंचनाची पातळी १२.७ टक्क्य़ांचे गंभीर प्रमाण दर्शविणारी असेल. केअर आणि इक्रा या पतमानांकन संस्थांनी अनुक्रमे ९.९ टक्के आणि ९.५ टक्क्य़ांच्या आकुंचनाचा अंदाज वर्तविला आहे. क्रिसिलच्या अर्थविश्लेषकांनी मात्र उणे १२ टक्क्य़ांची अधोगती दर्शविणारी आकडेवारी येईल, असे भाकीत केले आहे.