भांडवली बाजारात बुधवारी आश्चर्यकारक तेजी अनुभवली गेली. १७२.०८ अंश वाढीने सेन्सेक्स २४,८५४.११ वर येताना त्याच्या गेल्या १९ महिन्यांच्या तळातूनही बाहेर आला. जागतिक निर्देशांकाच्या तेजीवर येथील निफ्टीही ५२.१० अंश वाढीसह ७,५६२.४० वर पोहोचला.

मंगळवारी जाहीर झालेल्या घसरत्या औद्योगिक उत्पादन व वाढत्या महागाई दराकडे दुलक्र्ष करत बाजारात गुंतवणूकदारांनी बुधवारी खरेदीचे धोरण अवलंबिले. चीनसह प्रमुख जागतिक बाजारांच्या तेजीलाही येथील निर्देशांकांनी साथ दिली. येत्या आठवडय़ात जाहीर होणाऱ्या तिमाही वित्तीय निकालामुळे सध्या चर्चेत असलेला रिलायन्स इंडस्ट्रीजचा समभाग सेन्सेक्समध्ये तेजीत सर्वात वर राहिला. तर गुरुवारी तिमाही निष्कर्ष जाहीर करणाऱ्या इन्फोसिसचा समभागही ३ टक्क्यांनी वाढला. अपेक्षाभंग करणाऱ्या निकालांमुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातीलच टीसीएसच्या समभागाने बुधवारी त्याचे गेल्या वर्षभरातील नीचांक मूल्य गाठले.

सेन्सेक्समधील १७ समभागांचे मूल्य वाढले.

व्यवहारातील तळातून सेन्सेक्सची सत्रातील वाढ ३०० अंशांपर्यंत गेली. सत्रात मुंबई निर्देशांक २४,९५६.५४ पर्यंत झेपावला होता. तर निफ्टीची मजल ७,५६२.४० पर्यंत गेली.  मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांक मात्र अनुक्रमे ०.४६ व १.७६ टक्क्यांनी घसरले.

चीनसह आशियातील प्रमुख बाजारातील निर्देशांकही तेजीवर स्वार होते. तर युरोपीय बाजारांची सुरुवात वाढीसहच झाली