28 September 2020

News Flash

व्याजदर कपात की कर्जहप्ते सवलतवाढ?

रिझव्‍‌र्ह बँकेच्या आजच्या पतधोरणात निर्णयाची शक्यता

संग्रहित छायाचित्र

टाळेबंदीच्या गर्तेत अडकलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँक पुन्हा एकदा व्याजदर कपात करणार का? रोजगार तसेच वेतनकपातीचा सामना करणाऱ्या कर्जधारकाला मासिक हप्ते लांबण्याची संधी आणखी विस्तारणार का? या प्रश्नांची उत्तरे रिझव्‍‌र्ह बँके च्या सलग तीन दिवस चालणाऱ्या बैठकीनंतर गुरुवारी मिळणार आहेत. मध्यवर्ती बँके च्या द्विमासिक पतधोरण आढाव्याबाबतची बैठक गुरुवारी संपत असून त्यात याबाबत निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या २४ व्या बैठकीला मंगळवारपासून प्रारंभ झाला. तीन दिवस चाललेल्या बैठकीतील निर्णय रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास दुपारपूर्वी समाजमाध्यमावरून जाहीर करतील.

करोनामुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याची निकड आणि उद्योगाद्वारे कर्जाच्या पुनर्रचनेच्या मागणीवर या द्वि-मासिक बैठकीत विचारमंथन अपेक्षित आहे. बहुसंख्य समिती सदस्य व्याजदर कमी करण्याच्या बाजूने कौल देण्याची बाजाराला अपेक्षा आहे. मार्च आणि मे महिन्यातील बैठकीत मिळून रिझव्‍‌र्ह बँकेने १.१५ टक्क्याची व्याजदर कपात केली आहे. फेब्रुवारी २०१९ ते मे २०२० दरम्यान रिझव्‍‌र्ह बँकेने रेपो दरात २.५० टक्क्यांची कपात केली आहे. करोनामुळे टाळेबंदी घोषित झाल्यानंतर पहिल्यांदा मंजूर केलेल्या कर्जहप्ते लांबणीवर टाकण्याच्या निर्णयाला मुदतवाढ देण्यात आली. ती येत्या ३१ ऑगस्ट रोजी संपत आहे. ती पुन्हा वाढवून येत्या डिसेंबर २०२० पर्यंत करण्याची अटकळ अर्थतज्ज्ञ, बँकप्रमुखांना आहे.

करोना विषाणू बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे सद्य:स्थितीत भारतातील काही महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पुणे शहरांमध्ये आणि देशाच्या अन्य शहरात पुन्हा टाळेबंदीची मुदत वाढविली असल्याने रिझव्‍‌र्ह बँक कर्ज स्थगितीला ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्याची शक्यता आहे. कर्जस्थगितीमुळे बँकांच्या रोकड सुलभतेवर विपरीत परिणाम झाला असून बँकांचा कर्ज स्थगिती कालावधी वाढविण्यास विरोध आहे.

तिमाही निकालानंतर वृत्तसंस्थांशी बोलताना स्टेट बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी हप्ते स्थगितीस मुदतवाढ देण्यास विरोध केला होता.

तसेच कोटक बँकेचे अध्यक्ष उदय कोटक, एचडीएफसी समूहाचे अध्यक्ष दीपक पारेख यांनीही हप्ते स्थगितीमुळे बँकांच्या अनुत्पादित कर्जात वाढ होण्याची शक्यता वर्तविली होती. मात्र सद्य:स्थिती पाहता रिझव्‍‌र्ह बँक पुन्हा मुदतवाढ देण्याची शक्यता विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.

रिझव्‍‌र्ह बँक व्याजदर कपात करण्याचा निर्णय घेईल, असे तूर्त तरी वाटत नाही. कपात केली तरी अत्यंत अल्प कपात करून पतधोरणाचा रोख बदललेला नसून पतधोरण अद्याप ‘सोयीचे‘ असल्याचा संकेत देण्याचा रिझव्‍‌र्ह बँकेचा प्रयत्न कदाचित होऊ शकतो.

– अन्वेष जैन, निधी व्यवस्थापक, कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड.

रिझव्‍‌र्ह बँकेने या आधीच्या दोन बैठकीत मिळून ११५ शतांश टक्क्यांची दर कपात केल्याने समिती या दर कपातीच्या परिणामांची वाट पाहणे पसंत करेल, असे वाटते. भविष्यात आवश्यकता भासल्यास निश्चितच व्याजदर कपातीचा विचार रिझव्‍‌र्ह बँके ला करता येईल.

– पंकज पाठक, निधी व्यवस्थापक, क्वांटम म्युच्युअल फंड.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 12:17 am

Web Title: todays credit policy of the reserve bank abn 97
Next Stories
1 वाहन कंपन्या सज्ज, सणजोडीला नवीन उत्पादने
2 क्रिसिल क्रमवारीत अ‍ॅक्सिस,कॅनरा रोबेको अव्वल
3 सोने ५५ हजार रुपयांपुढे, चांदीची सत्तर हजारी मजल
Just Now!
X