फुशारलेल्या टोमॅटोपायी ग्राहकांची ‘रूची’त तडजोड

अ‍ॅसोचॅम’च्या पाहणीचा निष्कर्ष
गेल्या काही दिवसांत बाजारात वधारलेल्या टोमॅटोच्या किमतींपायी कुटुंबाचे मासिक अंदाजपत्रक बिघडवू न देणारा उतारा ग्राहकांनी शोधल्याचे एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे. बाजारात उपलब्ध टोमॅटोचा तयार रस अर्थात प्युरी, केचप, आले-लसणाचे तयार मिश्रण यांना अलीकडे वाढलेली मागणी ग्राहकांनी स्वीकारलेली पर्यायी तडजोडीला अधोरेखित करते.
कांदे, टोमॅटो, आले या जिनसांची रोजच्या आहारात गरज पाहता, त्यांच्या अकस्मात दुपटीच्या घरात वाढलेल्या किमतींनी जवळपास ७२ टक्के अल्प उत्पन्न व मध्यम उत्पन्न गटातील कुटुंबांचा आर्थिक अंदाजपत्रकाला कोलमडून टाकणारा परिणाम साधला असल्याचे ‘अ‍ॅसोचॅम’ या उद्योग संघटनेने केलेल्या सर्वेक्षणाने मत व्यक्त केले आहे. मुंबई, दिल्ली-एनसीआर, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद व हैदराबाद या महानगरांतील तब्बल १००० गृहिणींमध्ये ही पाहणी केली गेली आहे. भाववाढीचे सर्वाधिक चटके दिल्ली, मुंबई व अहमदाबादमधील गृहिणींना जाणवत असल्याचे पाहणी सांगते.
अनेकांनी टोमॅटो महागला म्हणून तो आहारातून त्यागण्याचा पर्याय जवळ केला. तर दुसरीकडे बाजारात तुलनेने स्वस्त उपलब्ध प्युरी, केचप व तत्सम तयार मिश्रणांचा पर्यायही अनेकांनी स्वीकारला. या तयार उत्पादनांच्या या दिवसांतील विक्रीत अकस्मात २०ते २५ टक्क्य़ांनी झालेली वाढ पुरेसी बोलकी आहे, असे अ‍ॅसोचॅमचे महासचिव डी. एस. रावत यांनी सांगितले.
पाहणी केलेल्या शहरांमध्ये टोमॅटोचे भाव महिनाभरात दुपटीने वाढून किलोमागे ६०-६५ रुपयांवर गेले आहेत. काही महिन्यांपूर्वी प्रचंड वधारलेला कांदा आजही किलोमागे ४० रुपयांवर, तर स्वयंपाकघरातील रोजच्या गरजेच्या लसूण, आलेही किलोमागे १६० रु. ते २०० रुपयांवर भडकले आहेत.