भारतीय हवाई क्षेत्रात व्यवसाय करण्यासाठी खूप संधी आहे. येथे या क्षेत्रातही नवे मार्ग जोपासले गेले पाहिजे. आम्ही कुणाची बाजारहिस्सा हिसकावून घेण्यासाठी अथवा मनुष्यवळ आकर्षित करण्यासाठी येथे आलेलो नाही, असे एअरएशियाचे अध्यक्ष टोनी फर्नाडिस यांनी सोमवारी स्पष्ट केले.
भल्या सकाळी आर्थिक राजधानीत तातडीने बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत फर्नाडिस यांनी कंपनीची हवाई प्रवासी सेवा आगामी वर्षांतच सुरू होईल, असे स्पष्ट केले. शिवाय तिकिट विक्री व दर याबाबत कंपनी अनोखी असेल, असा विश्वासही दर्शविण्यात आला.
फर्नाडिस यांच्याबरोबर यावेळी एअरएशिया इंडियाचे उपाध्यक्ष कमरुद्दीन मेराननून तसेच नवे मुख्य कार्यकारी अधिकारी मिट्टू शांडिल्य हेही यावेळी उपस्थित होते. टोनी हे मंगळवारी नवी दिल्लीत केंद्रीय हवाई नागरी मंत्री अजितसिंह यांचीही भेट घेणार आहेत.
टोनी म्हणाले की, भारतीय हवाई क्षेत्रातील विद्यमान कंपन्यांचा बाजारहिस्सा काबीज करण्यासाठी आम्ही येत नसून देशात नवी बाजारपेठ निर्माण करण्याकरता आमचे अस्तित्व निर्माण होत आहे. भारतीय हवाई प्रवास बाजारपेठ ही मोठी बाजारपेठ असून येथे खूप मोठा वाव आहे. कंपनीला येथे व्यवसाय करण्यास कोणत्याही प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुढील वर्षी तीन विमानाद्वाारे हवाई प्रवासी सेवा सुरू करण्यात येईल, अशी घोषणा यावेळी करण्यात आली. यासाठी वर्षांला १० विमाने कंपनीच्या ताफ्यात दाखल करून घेतली जातील. कंपनीचा मुख्य व्यवसाय दक्षिण भारतात कार्यरत राहणार असून हवाई प्रवासाचे दरही किमान असणार आहेत. कंपनी एजंट अथवा ट्राव्हेल पोर्टलऐवजी स्वत:ची तिकिट विक्री सेवा राबविणार आहे. कंपनीत इच्छुक असणारे वैमानिक, हवाई सुंदरी आदी कर्मचाऱ्यांना बाजारात असणाऱ्या वेतनश्रेणीवरच रुजू करून घेण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. कंपनीच्या सध्याच्या गरजेनुसार प्रत्येक विमानामागे केवळ १० वैमानिक व १६ केबिन क्रूची आवश्यकता भासेल.
मुळचे भारतीय, चेन्नईचेच असणाऱ्या टोनी यांची मुख्य एअरएशिया ही कंपनी मलेशियात आघाडीवर आहे. खुद्द टोनी फर्नाडिस यांच्यासह टाटा सन्स आणि दिल्लीस्थित उद्योगपती अरुण भाटिया यांचा भारतीय कंपनीत अनुक्रमे ४९, ३० व २१ टक्के हिस्सा आहे. नव्या एअरएशिया इंडियात हिस्सेदारीत टाटा समूह दुसऱ्या स्थानावर असला तरी कंपनीच्या संचालक मंडळावर सर्वाधिक ४ सदस्य टाटा समूहातील वरिष्ठ अधिकारीच आहेत.