महिंद्र अॅण्ड महिंद्रच्या इगतपुरी प्रकल्पातील दोन कामगारांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ हजारो कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारल्याने उत्पादन प्रक्रिया ठप्प झाली आहे. यामुळे महिंद्रासह त्यावर अवलंबून असणाऱ्या लघु उद्योगांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.
इगतपुरी शहरातील महिंद्राच्या या प्रकल्पात वाहनाच्या इंजिन व सुट्टय़ा भागाची निर्मिती केली जाते. सोमवारी दुपारी कारखान्याच्या आवारात कामगार सेनेचे अध्यक्ष सुनील यादव व मदन जाधव यांच्यात काही कारणावरून हाणामारी झाल्याने व्यवस्थापनाने दोघांवर निलंबनाची कारवाई केली होती. ही बाब समजल्यानंतर त्यांचे निलंबन मागे घ्यावे, या मागणीसाठी अचानक कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले. यामुळे सोमवारी दुपारनंतर बंद झालेले काम मंगळवारी सायंकाळपर्यंत सुरू होऊ शकले नाही. निलंबित केलेल्या कामगारांना जोपर्यंत कामावर घेतले जात नाही, तोपर्यंत काम न करण्याचा पवित्रा कामगारांनी घेतला आहे. परिणामी, या प्रकल्पातील उत्पादन प्रक्रिया जवळपास पूर्णपणे बंद पडली. व्यवस्थापन कामगारांमध्ये दुही निर्माण करीत असल्याचा आरोप केला जात आहे. १३ नोव्हेंबर २०१२ रोजी कराराची मुदत संपुष्टात आली होती. त्यानंतर कामगार प्रतिनिधी व व्यवस्थापन यांच्यात तब्बल अकरा वेळा बैठका होऊनही तोडगा निघाला नाही. व्यवस्थापनाने दुही निर्माण होईल, असे प्रयत्न केल्यामुळे सोमवारचा प्रकार घडल्याचे कामगारांचे म्हणणे आहे.
दरम्यान, या संदर्भात प्रकल्पाचे वरिष्ठ व्यवस्थापक नितीन देशपांडे यांनी व्यवस्थापनाची बाजू मांडली. कारखान्यात झालेल्या प्रकाराची दखल घेऊन दोन्ही कामगारांवर व्यवस्थापनाने निलंबनाची कारवाई केली आहे. कराराबाबत व्यवस्थापन कामगार प्रतिनिधींशी केव्हाही चर्चा करण्यास तयार असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. कामगारांच्या अकस्मात आंदोलनामुळे किती नुकसान झाले, याविषयी विचारणा केली असता देशपांडे यांनी आपणास त्याची कल्पना नसल्याचे स्पष्ट केले.