‘व्होडाफोन’च्या रूपात पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करावयाच्या करांमध्ये होरपळून निघालेल्या ब्रिटनलाही मोदी सरकारकडून कारकिर्दीत मोठय़ा अपेक्षा आहेत. तुमच्या-आमच्यासारख्यांप्रमाणेच केंद्रात एकहाती सत्ता मिळविणाऱ्या नव्या सरकारबरोबर काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत, अशी भावना मोदींना व्हिसा नाकारणाऱ्या या देशाच्या मंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
ब्रिटनचे विदेशमंत्री व अर्थमंत्री सध्या भारत दौऱ्यावर आहेत. मुंबई भेटीदरम्यान सोमवारी त्यांनी प्रसारमाध्यमे व निवडक भारतीय उद्योगांशी संवाद साधला. ब्रिटिश वकिलातीमार्फत आयोजित स्नेहभोजनानंतर उभयतांनी भाजपाप्रणीत लोकशाही आघाडी सरकारचे तोंडभरून कौतुक केले.
दूरसंचार ताबा प्रकरणात ब्रिटनची वोडाफोन भारताने लादलेल्या कर कटकटीचा अद्यापही सामना करत आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीनंतर लोकशाही आघाडी सरकार सत्तेत येऊनही हा तिढा अद्याप सुटलेला नाही. तर गुजरात दंगलीनंतर तत्कालीन मुख्यमंत्री राहिलेल्या नरेंद्र मोदींवरील ब्रिटनची व्हिसा बंदी आंतरराष्ट्रीय चर्चेचा विषय बनली होती.
विदेशमंत्री विल्यम हॉग या वेळी म्हणाले की, भारतातील माझा हा तिसरा दौरा आहे. भारतासारखे गुंतवणूकपूरक वातावरण अन्यत्र कमीच आहे. दोन महिन्यांपूर्वी पार पडलेल्या सर्वात मोठय़ा लोकशाही देशाची निवडणूक प्रक्रिया तर साऱ्या जगानेच पाहिली आणि सामान्यांना चांगले दिवस आणण्याचा अर्थसंकल्पीय कार्यक्रमही येऊ घातला आहे.
भारतात पर्यटन-चित्रपट, आरोग्यनिगा, विज्ञान, शिक्षण, पायाभूत सेवा क्षेत्रात व्यवसाय करण्याची ब्रिटनला खूप इच्छा असून आंतरराष्ट्रीय दहशतवाद, आंतरराष्ट्रीय व्यापार या क्षेत्रात एकत्र कार्य करण्याची आपल्या देशाची मनीषा असल्याचे विदेश मंत्र्यांनी या वेळी नमूद केले.
अर्थमंत्री जॉर्ज ओस्बोर्ने यांनी या वेळी ब्रिटनमधील भारतीयांची गुंतवणूक आदी विषयांना छेडले. टाटा, महिंद्र, ग्लॅक्सोस्मिथक्लाईम या कंपन्यांची नावे घेत त्यांनी शिक्षण क्षेत्रात दिले ब्रिटनमार्फत दिले जाणाऱ्या सर्वाधिक शिष्यवृत्तींचाही उल्लेख केला.
‘चांगले दिवस येणार आहेत’ हे अर्थातच अर्थमंत्र्यांनी इंग्रजीत ‘गुड डे कमिंग’ म्हणत मोदी सरकारकडून गुंतवणूक, व्यापार, ऊर्जा तसेच रोजगारामध्ये वृद्धीची अपेक्षा व्यक्त केली. दोन दिवसानंतर येणाऱ्या अर्थसंकल्पात ‘गुड डे’ दिसतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. विशेषत: निर्यात क्षेत्रात भारतीच रुपयाला आंतरराष्ट्रीय चलनाचा दर्जा मिळण्याचा आग्रह त्यांनी या वेळी धरला.
महिंद्र : ३० दशलक्ष पौंडांची गुंतवणूक
महिंद्रकडून विजेरी कार उत्पादन व विक्रीसाठी ब्रिटनला पसंती देण्यात आली आहे. कंपनीने ३० दशलक्ष पौंड गुंतवणुकीचा प्रस्ताव ठेवला आहे. यानुसार कंपनीची विजेरी कार उत्पादन व विक्री येत्या वर्षांपासून सुरू होणार आहे. दुपारच्या उद्योजक-माध्यम भेटीपूर्वी ब्रिटनच्या अर्थमंत्र्यांनी महिंद्रच्या उपनगरातील वाहन उत्पादन प्रकल्पातही हजेरी लावली. या वेळी त्यांच्याबरोबर महिंद्र समूहाच्या वाहन विभागाचे अध्यक्ष पवन गोएंका हेही उपस्थित होते.
टाटा समूहाचे कौतुक
ब्रिटनमध्ये सर्वाधिक रोजगार व उत्पादनक्षमता असलेला टाटा समूह असल्याबद्दल उपस्थित मंत्र्यांनी भारताविषयी अभिमानाचे उद्गार काढले. टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा हेही या वेळी उपस्थित होते. रतन टाटा यांच्याप्रमाणेच लक्ष्मीनिवास मित्तल यांचा ब्रिटनमध्ये मोठा पोलाद प्रकल्प आहे. अन्य उपस्थितांमध्ये अनिल धारकर, सुनील अलग, हिमांशू रॉय आदींचा समावेश होता.
सिप्ला : १० कोटी पौंडांची गुंतवणूक  
जागतिक स्तरावर आघाडीची व मुळची मुंबईतील सिप्ला कंपनीने ब्रिटनमध्ये १० कोटी पौंड (जवळपास १,०३० कोटी रुपये) गुंतवणूक घोषित केली आहे. कंपनी ब्रिटनमधील आपल्या अस्तित्वातील प्रकल्पाची निर्मितीक्षमता विस्तारण्यासाठी ही रक्कम खर्च करणार आहे. त्याचबरोबर नव्या औषधांची निर्मितीही यातून केली जाईल. येथून निर्माण होणारी औषधे ही ब्रिटिश राष्ट्रीय आरोग्य सेवेअंतर्गत माफक दरातील असतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.