ज्या मराठी माणसाच्या कल्पनाशक्तीतून उतरलेल्या नॅनोने भारतीय प्रवासी वाहन क्षेत्रात खळबळ उडवून दिली त्याच गिरीश वाघ यांच्या अथक चार वर्षांतील संशोधनाअखेर टाटा मोटर्सने स्वयं बनावटीचे इंजिन तयार केले आहे. प्रामुख्याने डिझेलवर धावणाऱ्या वाहनांसाठी ओळखले जाणाऱ्या टाटा मोटर्सने आता पेट्रोलवरील या इंजिनावर धावणारी विविध वाहन शंृखलाच येत्या महिन्यात होणाऱ्या प्रदर्शनात सादर करण्याची तयारी पूर्ण केली आहे.
नवी दिल्लीतील २००८ मधील ‘ऑटो एक्स्पो’मध्ये रतन टाटा यांनी त्यांच्या स्वप्नातील ‘लाखाची कार’ सादर केली गेली ती गिरीश वाघ या मराठमोळ्या माणसाच्या कल्पनाशक्तीतून. पहिल्या सादरीकरणानंतर प्रत्यक्षात वर्षभरात रस्त्यावर धावू लागणाऱ्या नॅनोचा प्रवास गेल्या चार वर्षांत काहीसा बिकट बनला. मात्र गेल्या दोनेक वर्षांपासून नॅनोची विक्री पुन्हा रुळावर आली. नॅनोनंतर वाघ यांच्याकडे टाटा मोटर्सच्या संशोधन व विकास विभागाची जबाबदारी देण्यात आली. सध्या कार्यक्रम नियोजन आणि प्रकल्प व्यवस्थापन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष असलेल्या वाघ यांनी समूहातील संपूर्ण स्वयं बनावटीचे पेट्रोलवरील इंजिन तयार केले आहे. विविध २० संशोधने आणि पेटंट असलेल्या या इंजिनाला ‘रिव्होट्रॉन’ असे नाव देण्यात आले असून १.२(टी) लिटर क्षमतेचे हे इंजिन तुलनेने वजनाला हलके व इंधन किफायतक्षम असल्याचा दावा करण्यात आला आहे. बॉश, हनिवेल, आयएनए यांचे सहकार्य लाभलेले ४ सिलिंडरचे ‘रिव्होट्रॉन’ इंजिन सध्या पिंपरी प्रकल्पात तयार करण्यात येत आहे.
कॉम्पॅक्ट कार लवकरच?
स्पोर्ट युटिलिटी वाहनानंतर सध्या जोमाने वाढणाऱ्या कॉम्पॅक्ट वाहन प्रकारात उशीरा का होईना टाटा मोटर्स उतरण्याच्या तयारीत आहे. सध्या या क्षेत्रात रेनॉच्या डस्टर व फोर्डच्या इकोस्पोर्टने विक्रीत धुमाकूळ घातला आहे. अर्टिगाद्वारे एमयूव्हीमध्ये मारुती सुझुकीने महिंद्र, टोयोटा यांच्या मोठय़ा वाहनांसमोर आव्हान उभे केले असतानाच मारुतीची कट्टर स्पर्धक ुंदाईही वाहन प्रदर्शनाच्या व्यासपीठावर कॉम्पॅक्ट कार सादर करणार आहे. असे असतानाच खास ‘कॉम्पॅक्ट कार’साठी सुयोग्य असे ‘रिव्होट्रॉन’ सादर करून टाटा मोटर्सनेही फेब्रुवारीच्या नोएडातील ‘ऑटो एक्स्पो’त या श्रेणीत पदार्पणाचे संकेत दिले आहेत.
‘नॅनो’मागील हात टाटा मोटर्सच्या हृदयातही संपूर्ण स्वदेशी बनावटीचे इंजिन ‘रेव्हेट्रॉन’ दाखल!