तुम्ही शोरूममध्ये जाऊन एखादी दुचाकी अथवा चारचाकी खरेदी करू इच्छिता. त्यासाठी ‘टेस्ट राइड’ देण्याची तयारीही संबंधित कंपनीच्या दालनातील सेवक दाखवितात. मात्र सायकल घ्यायची असल्यास असे घडते काय? सायकलची ‘टेस्ट राइड’ एखादा दुकानदार देतो का? मात्र उत्पादन विपणनाची ही अनोखी मोहीम स्कॉट ही विदेशी सायकल मुद्रा भारतात राबविणार आहे.
मूळच्या स्वित्झर्लॅण्डच्या स्कॉट स्पोर्ट कंपनीने येथे ही सुविधा उपलब्ध करून देण्याचे निश्चित केले आहे. यानुसार कंपनी येत्या ऑगस्टपासून देशातील प्रमुख ४० शहरांमध्ये कंपनीच्या सायकलींची ‘टेस्ट राइड’ उपलब्ध करून देत आहे. कंपनीच्या सायकली फ्रान्समध्ये होणाऱ्या सुप्रसिद्ध सायकल शर्यतींमध्ये स्पर्धकांमार्फत चालविल्या जातात.
स्कॉट स्पोर्ट्स इंडिया ही २००८ पासून भारतात सायकलींची विक्री करते. प्रीमियम श्रेणीतील सायकल निर्मितीत कंपनी आघाडीवर आहे. सायकलींसह कंपनी घडय़ाळे, चष्मे, कीचेन आदी उत्पादनांमध्येही कार्यरत आहे. भारतात ८० विक्री दालने असणाऱ्या या कंपनीचा मुख्य निर्मिती प्रकल्प हा स्वित्झर्लॅण्डमध्ये आहे. येत्या महिन्यात होणाऱ्या ‘टुर द फ्रान्स’ सायकल शर्यतीतही कंपनीची दोन उत्पादने स्पर्धकांमार्फत उतरविली जात आहेत.
सायकल विक्रीच्या या अनोख्या मोहिमेबाबत स्कॉट स्पोर्ट्स इंडियाचे भारतातील प्रमुख जयमिन शाह यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले की, सायकलींच्या वापराविषयी प्रसार करणाऱ्या मोहिमा, समूहांमध्येही स्कॉट नेहमीच पुढाकार घेते. याअंतर्गतच कंपनीने पुण्यातील तीन विद्यार्थ्यांनी मुंबई-पुणे सायकल प्रवासावरील तयार केलेल्या १८ मिनिटांच्या ‘निकल पडो’ या लघुपटालाही सहकार्य केले होते.
कंपनीने गेल्याच वर्षी ‘वाणी’ या महिलांच्या एका गटाला पाठिंबा दिला होता. शिक्षणविषयक प्रसार करणाऱ्या या महिलांच्या समूहाने कोलकत्ता ते बंगळुरू असा सायकल प्रवास स्कॉटच्या सायकलींद्वारे केला.
यामध्ये सहभागी महिलांनी आम्ही दररोज १० ते १२ किलोमीटर प्रवास अधिक केल्याचे मत नोंदविले. याच गटातील महिलांनी कच्छ ते कोची हा जवळपास अडीच हजार किलोमीटरचा प्रवास साध्या सायकलींद्वारे केला होता. यामध्ये १२ ते ६८ वयोगटातील स्त्रीवर्ग होता. सायकल वापराच्या प्रोत्साहनार्थ सर्वच उपक्रमांत आमचा सक्रिय सहभाग राहिला आहे, असेही शाह म्हणाले.