भारतीय खेळणी उत्पादकांमध्ये आघाडीवर असणाऱ्या टॉयक्राफ्टने या क्षेत्रातील वाढती मागणी लक्षात घेऊन महाराष्ट्रातील दुसरा प्रकल्प प्रगतीपथावर नेण्याचा संकल्प जाहिर केला आहे. यानुसार कंपनी मुंबईनजीकच्या कल्याण येथे नवा प्रकल्प वर्षभरात सिद्धीस नेणार आहे.
टॉयक्राफ्टच्या व्यवसाय विभागाचे संचालक डॉ. श्याम मखिजा यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले की, कंपनीचा कल्याण येथील प्रकल्प हा १५ हजार चौरस फूट क्षेत्रफळावर असेल. पैकी प्रत्यक्ष खेळणी निर्मिती ही ९,००० चौरस फूट क्षेत्रफळात होईल. वर्षभरात तो अस्तित्वात येणार असून त्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळही जोपासले जाणार आहे. कंपनीचा ठाणे जिल्ह्यातीलच वसई येथेही खेळणी निर्मिती प्रकल्प आहे. तेथील निर्मितीक्षमता वार्षिक ६०,००० खेळणी असून कल्याणच्या प्रकल्पामुळे ती वार्षिक ७५,००० खेळणी होईल. यासाठीची गुंतवणूक कंपनी अंतर्गत माध्यमातून करणार असून सुरुवातीची दोन ते तीन वर्षे तरी कंपनीला खासगी गुंतवणूकदारांची गरज भासणार नाही, असेही मखिजा यांनी स्पष्ट केले. कंपनीत सध्या १०० हून अधिक मनुष्यबळ कार्यरत आहे.
बच्चे मंडळींमध्ये प्रसिद्ध असलेल्या बालवीर मालिकेशी निगडित अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड टॉयक्राफ्टने आता दिली आहे. यासाठी सब दूरचित्रवाणी वाहिनीबरोबर करण्यात आलेल्या भागीदारीतून नवा कौटुंबिक खेळही प्रथमच भारतीय बाजारपेठेत आणला गेला आहे. त्याची किंमत ५४९ रुपयांपासून पुढे आहे. टॉयक्राफ्ट ही कंपनी २००७ मध्ये भारतात अस्तित्वात आली. तर ब्रॅण्ड म्हणून तिला १९९९ पासून लोकप्रियता मिळू लागली. कंपनीची २०० हून अधिक उत्पादने आहेत.–
खेळण्यांत चीनची मक्तेदारी
ल्ल खेळणी व्यवसायात चीनची मक्तेदारी असून हा देश प्रामुख्याने प्लास्टिकची खेळणी मोठय़ा प्रमाणात तयार करतो, असे गोरेगावमध्ये अलीकडेच पार पडलेल्या ‘किड्स इंडिया २०१३’ या खेळणी उद्योगाच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनानेही अधोरेखित केले. भारतीय खेळणी बाजारपेठ ही २,४०० कोटी रुपयांची असून ती वर्षांला १५% गतीने विस्तारत आहे. प्रदर्शनानिमित्ताने भारतीय कंपन्यांच्या खेळण्यांच्या ब्रॅण्डला जागतिक बाजारपेठेत शिरकावाची संधी दिली आहे.