कामगार संघटनेबरोबरच्या वादातून येथील बिदाडी उत्पादन प्रकल्पात गेल्या आठ दिवसांपासून लागू असलेली टाळेबंदी टोयोटा इंडियाने मंगळवारपासून उठविली खरी, परंतु स्थायी कामगारांऐवजी नवीन १००० कंत्राटी कामगारांना घेऊन उत्पादन सुरू करीत असल्याचे तिने जाहीर केले. 

वेतनवाढीसाठी संघर्षांचा पवित्रा घेणाऱ्या कामगार संघटनेला डावलून चांगल्या व्यवहाराची ग्वाही देणाऱ्या हमीपत्रावर स्वाक्षरी करणाऱ्याच कामगारांना कामावर रुजू करून घेतले जाईल, असा टोयोटा किलरेस्कर इंडिया लि.च्या व्यवस्थापनाचा पवित्रा आहे. तोवर कंत्राटी कामगार, २००० च्या घरात असलेले प्रशिक्षणार्थी कामगार आणि अधिकाऱ्यांच्या मदतीने प्रति दिन ७५० कार या स्थापित क्षमतेने उत्पादन सुरू राहील, असे कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
टोयोटाच्या येथील दोन उत्पादन प्रकल्पात ६,४०० कायमस्वरूपी कामगारांचा रोजगार सुरू असून, व्यवस्थापनाच्या सध्याचा पवित्रा पाहता, कर्नाटकचे कामगारमंत्री परमेश्वर नाईक यांना कामगारांचे हित आणि रोजगाराच्या सुरक्षेसाठी हस्तक्षेप करण्याचे आवाहन युनियनकडून करण्यात आले आहे. कंत्राटी कामगार व अर्धकुशल प्रशिक्षणार्थीना घेऊन नियमित कामगारांविना उत्पादन घेता येऊ शकते, असे कंपनी दर्शवू पाहत आहे, पण यातून गुणवत्तेशी तडजोड केली जात आहे, अशा या प्रक्रियेतील जोखमीकडे युनियनचे अध्यक्ष प्रसन्न कुमार यांनी लक्ष वेधले आहे.