टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा. लि.ने आपले सर्वाधिक लोकप्रिय ‘इनोव्हा’ हे बहुउद्देशीय वाहन संपूर्णपणे आंतर्बाह्य़ नवीन रूपात दाखल केले आहे. सात आसनी आणि आठ आसनी अशा पर्यायांत आणि युरो ३ आणि युरो ४ मानकांमध्ये नवीन इनोव्हा ही ‘झेड’ या सर्वोच्च श्रेणीसह सादर करण्यात आली आहे. आजवर देशभरात ४.३० लाखांहून अधिक इनोव्हा विकल्या गेल्या असून, ग्राहकांकडून आलेल्या सूचना-शिफारशींच्या आधारे नवीन इनोव्हात सामावण्यात आलेल्या अतिरिक्त वैशिष्टय़ांमुळे या वाहनाचा भारतीयांमधील पसंतीक्रम येत्या काळात आणखी उंचावण्याचा विश्वास टोयोटा किलरेस्करचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी हिरोशी नाकागावा यांनी व्यक्त केला. नवीन इनोव्हाची मुंबईतील एक्स-शोरूम किंमत रु. १२.९२ लाखांपासून सुरू होते, तर सर्वोच्च झेड श्रेणीतील वाहन रु. १५.६६ लाख किमतीत उपलब्ध झाले आहे. बुधवारी मुंबईत मिरा रोडस्थित टोयोटा किलरेस्करचे मुख्य वितरक मिलेनियम टोयोटा येथे या नव्या रूपातील इनोव्हाचे समारंभपूर्वक अनावरण केले गेले.