एप्रिलमधील आयात – निर्यात दरी पाच महिन्यांच्या उच्चांकावर

नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षांच्या सुरुवातीलाच व्यापार तूट विस्तारली गेली आहे. निर्यातीतील किरकोळ वाढ आणि तुलनेत आयातीतील वाढते प्रमाण यामुळे एप्रिलमधील व्यापार तूट १५.३३ अब्ज डॉलरवर गेली आहे. आयात – निर्यातीतील ही दरी गेल्या पाच महिन्यातील उच्चांकी टप्प्यावर पोहोचली आहे.

एप्रिल २०१८ मधील देशाच्या व्यापार कलविषयक आकडेवारी बुधवारी जाहीर झाली. यानुसार, गेल्या महिन्यात निर्यात ०.६४ टक्क्य़ांनी घसरून २६ अब्ज डॉलर नोंदली गेली आहे. ती गेल्या सलग चौथ्या महिन्यात रोडावली आहे. अभियांत्रिकी वस्तू, रत्ने तसेच दागिने, चामडे तसेच अन्य वस्तूंसाठीची भारताबाहेरील मागणी कमी झाल्याचा फटका निर्यातीवर झाला आहे.

तर गेल्या महिन्यात आयात ४.५ टक्क्य़ांनी वाढली आहे. ती गेल्या सहा महिन्यातील सर्वाधिक राहिली आहे. खनिज तेल तसेच सोन्याच्या वाढत्या मागणीने यंदाच्या एप्रिलमधील आयात ४१.१ अब्ज डॉलरवर गेली आहे. परिणामी व्यापार तूट नोव्हेंबर २०१८ नंतर प्रथमच विस्तारली आहे.

यापूर्वी डिसेंबर २०१८ मध्ये निर्यात सर्वात कमी, ०.३४ टक्के नोंदली गेली होती. तेल आयात गेल्या महिन्यात ९.२६ टक्क्य़ांनी वाझत ११.३८ अब्ज डॉलरवर गेली आहे. तर बिगर तेल आयात २.७८ टक्क्य़ांनी वाढली आहे.

सोने आयात गेल्या महिन्यात तब्बल ५४ टक्क्य़ांनी झेपावत ३.९७ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. ऐन सण-समारंभ, लग्नादी मुहूर्तामुळे मौल्यवान धातूसाठीची वाढती मागणी नोंदली गेली आहे. गेल्या काही दिवसात सोन्याच्या दरातही वाढ अनुभवली गेली आहे.

सेवा क्षेत्रातील निर्यात वाढली

भारताच्या सेवा क्षेत्रातील निर्यात गेल्या आर्थिक वर्षअखेर ६.६ टक्क्य़ांनी वाढली आहे. मार्च २०१९ मध्ये या क्षेत्राची विदेशातील मागणी १७.९४ अब्ज डॉलपर्यंत गेली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने बुधवारी जाहीर केल्यानुसार, सेवा क्षेत्राची आयातही वाढून ११.३७ अब्ज डॉलर झाली आहे. त्यात यंदा १०.५५ टक्के भर पडली आहे. परिणामी सेवा क्षेत्रातील तूट ६.५८ अब्ज डॉलर राहिली आहे. देशाच्या सकल उत्पादनात सेवा क्षेत्राचा हिस्सा ५५ टक्के आहे. या क्षेत्रात समावेश असलेल्या माहिती तंत्रज्ञान, पर्यटन, आदरातिथ्य आदींच्या प्रोत्साहनासाठी केंद्र सरकारने गेल्या वर्षांत ५,००० कोटी रुपयांचे सहाय्य देऊ केले होते.