स्थानिक संस्था कर (एलबीटी) विरोधात असलेल्या ‘फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र (फॅम)’चे अध्यक्ष मोहन गुरनानी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे शनिवारी भेटून त्यांचे म्हणणे ऐकून घेणार असल्याचे आज स्पष्ट करण्यात आले. तर ८ मेपासून मुंबईत बेमुदत बंद पाळणाऱ्या घाऊक व्यापाऱ्यांना शहरातील किरकोळ विक्रेते-दुकानदारांची साथ मिळून तेही बेमुदत बंदमध्ये सामील होणार आहेत.
‘फॅम’चे अध्यक्ष गुरनानी यांनी आझाद मैदानात सुरू केलेले उपोषण शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही सुरू असून, त्यांना पाठबळ म्हणून शनिवारी मुंबईतील सर्व घाऊक व किरकोळ व्यापारी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण आणि मोर्चाचे आयोजन करतील, असे ‘फॅम’ने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून मंगळवारी, ७ मे रोजी या संबंधीच्या अर्जावर काय निवाडा येतो, याकडेही आंदोलनकर्त्यांचे लक्ष आहे. तथापि, ‘फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशन’ने ८ मेपासून किरकोळ विक्रेते व दुकानदारही ‘एलबीटी’विरोधात बेमुदत बंदमध्ये सामील होत असल्याची घोषणा केली आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १ ऑक्टोबरपासून एलबीटी हा नवीन कर लागू होणार आहे.