वस्तू व सेवा करप्रणालीतील तरतुदींचा आढावा घेण्याची मागणी करत देशातील व्यापाऱ्यांनी येत्या २६ फेब्रुवारीला ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. ‘कॅट’च्या नेतृत्वाखाली होत असलेल्या या देशव्यापी आंदोलनात विविध १,५०० ठिकाणी निदर्शने होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

अप्रत्यक्ष कर अंमलबजावणीबाबतचे नियम पुन्हा एकदा तपासून पाहण्याची आवश्यकता नमूद करत ‘कॅट’ने (कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स) ही कर रचना सुटसुटीत करण्याची मागणी केली आहे. या प्रणालीचा अंगीकार व्यापाऱ्यांना सुलभ होण्यासाठी आवश्यक पावले उचलली जावीत, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.

आंदोलनाला ‘ऑल इंडिया ट्रान्सपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशन’ने पाठिंबा दिला असून २६ फेब्रुवारीला ‘चक्का जाम’ आंदोलन केले जाईल, अशी माहिती संघटनेने दिली. या आंदोलनात ४०,००० हून अधिक व्यापारी सहभागी होणार असून सर्व प्रमुख व्यापारी संकुलेही बंद राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

‘अ‍ॅमेझॉनवर बंदी घाला’

देशातील व्यापाऱ्यांचे मोठे व्यासपीठ असलेल्या ‘कॅट’ (कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स) ने, जागतिक तंत्रस्नेही किरकोळ विक्री कंपनी अ‍ॅमेझॉनच्या व्यवसायावर भारतात बंदी घालण्याची मागणी केली आहे.