भारतात आरोग्यनिगेसारख्या सेवा क्षेत्रात मूलपेशी कोश (स्टेम सेल बँकिंग) हे एक नवे दालन बनून पुढे येत असून, स्वत:च्या जतन केलेल्या मूलपेशीद्वारे अनेक दुर्धर आजारांवर उपचार शक्य बनविणाऱ्या या मूलपेशी चिकित्सांना वाढती स्वीकारार्हता पाहता, लवकरच या संबंधाने सरकारकडून नियमन आणि धोरणात्मक पाठबळ दिले जाईल. शिवाय या प्रकारच्या चिकित्सांना आरोग्यविम्याचे कवच लाभेल अशा नव्या धाटणीच्या पॉलिसीही विमा कंपन्यांकडून विकसित होणे दृष्टिपथात आहे.
भारतात मूलपेशी चिकित्सांची बाजारपेठ अद्याप प्राथमिक अवस्थेत असून, तिची व्याप्ती आर्थिक वर्ष २०१२-२०१३ सालात ४०० कोटी रुपयांच्या घरात जाणारी होती. नवजात अर्भकांच्या मूलपेशींच्या जतनाचे प्रमाण सध्या १ टक्क्यांहूनही कमी असून, दरसाल भारतात जन्माला येत असलेल्या दोन कोटी बालकांचे प्रमाण पाहता, या क्षेत्रात नवनव्या कंपन्यांना शिरकावासाठी मोठा वाव निश्चितच आहे, असे री लॅबॉरेटरीज प्रा. लि.चे संचालक व पॅथॉलॉजिस्ट डॉ. अभिजित बोपर्डीकर यांनी सांगितले. आजवर केवळ नाभीतील रक्त (कॉर्ड ब्लड) तसेच अस्थिमगज (बोन मॅरो) यापुरत्या सीमित राहिलेल्या भारतात मूलपेशी कोशात री लॅबॉरेटरीजद्वारे अन्य स्रोतातून मूलपेशींच्या जतनासाठी प्रगत संशोधन सुरू असून, त्यांच्या वेगवेगळ्या व्याधींवरील उपचारांमध्ये वापरासाठी संशोधनात्मक प्रयत्न सुरू आहेत.
सर्व प्रकारचे उपचाराचे मार्ग बंद झालेल्या अनेक दुर्धर व्याधींवरील मूलपेशी चिकित्सा (स्टेम सेल थेरपी) हा एक दिलासा ठरत आहे. या चिकित्सांना असलेले हे सामाजिक व आर्थिक परिमाण लक्षात घेता, त्यांना आरोग्यविमा संरक्षणात सामावून घेतल्यास लोकांचा या उपचार पद्धतींबद्दल कल वाढण्यास मोठी मदतच होईल, असा डॉ. बोपर्डीकर यांनी विश्वास व्यक्त केला, किंबहुना भविष्यात विमा कंपन्यांना अपरिहार्यपणे अशा नव्या पॉलिसी बाजारात आणणे भाग पडेल, असेही त्यांनी सांगितले.
सध्याच्या घडीला भारतात मूलपेशी बाजारपेठेत चिकित्सा व उपचारांसाठी पुढे आलेल्या थोडक्या ग्राहकांसाठी विविध १३ कंपन्या एकमेकांच्या स्पर्धेत उभ्या राहिल्या आहेत. या चिकित्सांबाबत उत्तरोत्तर जागृती आणि स्वीकारार्हता मिळत असली तरी याच्याशी निगडित काही सामाजिक आणि नैतिक मुद्दय़ांची तड लवकरात लवकर लावली जायला हवी. सरकारची या दृष्टीने नियामक म्हणून भूमिका महत्त्वाची राहील, असे बोपर्डीकर यांनी सांगितले. भविष्यात या जतन केलेल्या मूलपेशी उपचारासाठी वापरात येणार असल्याने, त्यांची निगा अत्यंत काळजीने आणि ठोस तांत्रिक माहितीच्या पाठबळावर केली जात आहे आणि स्टेम सेल बँकिंग लॅब ही आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिमान्यता असलेली आहे की नाही हे पाहणे आवश्यक ठरेल, असे डॉ. बोपर्डीकर यांनी सुचविले.