सर्व ५४,३८९ कोटींची देणी भागवण्याची भागधारकांची तयारी

बँकांचे सुमारे ४५,००० कोटी रुपये थकविणाऱ्या एस्सार स्टीलचे प्रकरण नादारी आणि दिवाळखोरी संहितेंर्गत समाधानाच्या अंतिम टप्प्यात असतानाच, गुरुवारी या संपूर्ण प्रक्रियेला कलाटणी देणारो प्रकार पटलावर आला.

एकूण ५४,३८९ कोटी रुपयांची देणी चुकती करण्याची तयारी एस्सार स्टीलच्या भागधारकांनी दाखविली असून, राष्ट्रीय कंपनी कायदे लवादापुढील प्रक्रियेतून माघारीची विनंती त्यांनी केली आहे. तसा प्रस्ताव कंपनीच्या भागधारकांनी मंजूर केल्याचेही स्पष्ट करण्यात आले. नादारी आणि दिवाळखोरी संहितेंर्गत राष्ट्रीय कंपनी कायदे लवादापुढे कर्जतिढा प्रक्रिया राबविण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने पहिल्या टप्प्यात निश्चित केलेल्या १२ कर्जखात्यांमध्ये एस्सार स्टीलचा समावेश आहे. या प्रक्रियेंतर्गत एस्सार स्टीलसाठीच्या बोलीकरिता अर्सेलरमित्तल ४२,००० कोटी रुपयांच्या बोली प्रस्तावासह जवळपास पात्र ठरली होती. तर रशियाची न्यूमेटल प्रमुख स्पर्धक होती.

एकूण ५४,३८९ कोटी रुपयांमध्ये मूळच्या बँकांच्या थकीत ४५,५५९ कोटी रुपयांसह ४७,५०७ कोटी रुपये रोखीने देण्याची तयारी एस्सार स्टीलची असल्याचे कळविण्यात आले आहे. देणी देण्याचा पूर्ण प्रस्ताव तयार असून त्यावर अंमलबजावणी केली जाईल, असे एस्सार स्टीलचे संचालक प्रशांत रुईया यांनी म्हटले आहे.

एस्सार स्टीलकरिता प्रमुख महसूल स्रोत असलेल्या तेल व वायू व्यवसायातील बिकट स्थितीमुळे एस्सार स्टीलला राष्ट्रीय कंपनी कायदे लवादाकडे धाव घ्यावी लागल्याचे कंपनीने म्हटले आहे. बँकांना कंपनी पुर्नबांधणीचा आराखडा डिसेंबर २०१६ मध्ये सादर केल्यानंतरही रिझव्‍‌र्ह बँकेच्या कारवाईला सामोरे जावे लागल्याचे कारण देत एस्सार स्टील गेल्या काही महिन्यांपासून समूहाची निधी उभारणी यशस्वी ठरत असल्याचे समर्थन गुरुवारचे पाऊल उचलताना देण्यात आले आहे.

‘भूषण’वरील जेएसडब्ल्यूची दावेदारी प्रबळ

भूषण पॉवर अँड स्टील या सुमारे ४५,००० कोटींचा कर्जभार असलेल्या कंपनीवरील जेएसडब्ल्यू स्टीलची दावेदारी प्रबळ झाली आहे. ताब्यासाठी बोली रक्कम वाढवणार नसल्याचे स्पर्धक टाटा स्टीलने जाहीर केल्याने भूषण पॉवर अँड स्टीलला कर्ज देणाऱ्या बँकांच्या समितीद्वारे आता जेएसडब्ल्यू स्टीलचा मार्ग मोकळा झाला आहे.

जेएसडब्ल्यूची सर्वाधिक १९,७०० कोटी रुपयांची बोली आहे, तर लिबर्टी हाऊस कंपनीची १९,००० कोटी रुपयांची बोली आहे. तुलनेत टाटा स्टीलने कमी, १७,००० कोटी रुपयांच्या बोलीसह किमान उत्सुकता दर्शविली आहे. परिणामी भूषण पॉवर अँड स्टीलकरिता कर्जदार समितीने जेएसडब्ल्यू स्टीलला सर्वाधिक पसंती दिल्याचे कळते.

दिवाळखोरी प्रक्रियेकरिता रिझव्‍‌र्ह बँकेने पहिल्या टप्प्यात निश्चित केलेल्या १२ थकीत कर्जखात्यांमध्ये भूषण पॉवर अँड स्टीलचा समावेश आहे. टाटा स्टीलची टाटा स्पाँज आयर्न या उपकंपनीने ४,७०० कोटी रुपयांना उषा मार्टिन ही कंपनी खरेदी करण्याच्या तयारी दाखविली आहे.