दुचाकी निर्मितीतील दक्षिणेतील आघाडीच्या टीव्हीएसने तिमाहीला एक या आश्वासनाप्रमाणे यंदा नवे वाहन बाजारात आणले आहे. ज्युपिटर या ११० सीसी इंजिन क्षमतेच्या नव्या गिअरलेस स्कूटरची किंमत ४४,२०० रुपये (एक्स-शोरूम नवी दिल्ली) आहे. टीव्हीएसच्याच व्हेगो आणि स्पर्धक अॅक्टिव्हापेक्षा चार रंगांतील ज्युपिटर खूपच स्वस्त आहे. व्हेगोद्वारे स्पर्धक होन्डाच्या अॅक्टिव्हाला टक्कर देणाऱ्या टीव्हीएसबरोबरच या क्षेत्रात सध्या इंडिया यामाहाची रे, हीरोची मॅस्ट्रो व प्लेजर, मिहद्रची रोडिओ व होंडाचीच एव्हिएटर या गिअरलेस स्कूटर आहेत.
कंपनी मोटरसायकलबाबतही ‘तिमाहीला एक’ हेच धोरण अवलंबेल, असे या निमित्ताने टीव्हीएस मोटर कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक वेणू श्रीनिवासन यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर स्कूटी श्रेणीतील स्कूटी झेस्ट ही नवी स्कूटर जानेवारी २०१४ मध्ये सादर करेल, असेही ते म्हणाले.
कंपनीच्या स्कूटी पेप, स्कूटी स्ट्रिक आणि व्हेगो या स्कूटर सध्या बाजारात आहेत. पैकी व्हेगोला सर्वच वर्गातून अप्रतिम प्रतिसाद मिळत आहे. कंपनीने गेल्याच महिन्यात १२५ सीसी फिनिक्स मोटरसायकल बाजारात आणली होती. तर गिअरलेस स्कूटर क्षेत्रातील कंपनीचा सध्याचा १३.५ टक्के बाजारहिस्सा ज्युपिटरच्या साहाय्याने १६ टक्क्यांपर्यंत नेण्याचा मानस कंपनीने व्यक्त केला आहे. यासाठी व्हेगो आणि ज्युपिटरच्या ३० हजार स्कूटर विक्रीचे उद्दिष्ट राखण्यात आले आहे. कंपनीला चालू आर्थिक वर्षांत एकूण दुचाकी विक्रीतील वाढ ७ टक्के अपेक्षित आहे. श्रीनिवासन यांनी चालू आर्थिक वर्षांची सुरुवात होण्यापूर्वीच कंपनी प्रत्येक तिमाहीला नवी एक दुचाकी सादर करेल, असे जाहीर केले होते.