News Flash

ट्विपण खटका : ‘अर्थ-उभारीचे काम सुरूच आहे’

किरण मुझुमदार-शॉ यांच्या टीकेचा अर्थमंत्र्यांकडून प्रतिवाद

| September 20, 2019 03:44 am

किरण मुझुमदार-शॉ यांच्या टीकेचा अर्थमंत्र्यांकडून प्रतिवाद

नवी दिल्ली : अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर सहा वर्षांच्या तळाला गेला असताना, त्या संबंधाने उमटणाऱ्या क्रिया-प्रतिक्रियांनी समाजमाध्यमे व्यापली आहेत. या स्थितीत कोणा उद्योगपतींनी थेट अर्थमंत्र्यांवर निशाणा साधण्याचा प्रसंग जसा विरळा, तसेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सामान्य शिरस्ता मोडून प्रत्युत्तरादाखल ट्विपणीद्वारे त्याचा प्रतिवाद करणेही अपवादात्मकच! बायोकॉनच्या अध्यक्षा किरण मुझुमदार-शॉ यांच्या अर्थवृद्धीला चालना देणाऱ्या वित्तीय उपायांची वानवा असल्याच्या टीकेला अर्थमंत्र्यांनी गुरुवारी तीन भागातील ट्विपणाद्वारे उत्तर दिले.

अर्थमंत्री सीतारामन या त्यांच्या संबंधाने केल्या जाणाऱ्या ट्विपणीला सामान्यत: प्रतिसाद अथवा चटकन उत्तर देण्याच्या भानगडीत पडत नाहीत. परंतु किरण मुझुमदार-शॉ यांच्या टीकात्मक ट्विपणीचा मात्र त्यांनी समाचार घेतला. तीन भागातील या ट्विपणीत सीतारामन म्हणाल्या, ‘‘अर्थमंत्री या नात्याने, माझे सुरू असलेले काम तुम्ही कदाचित पाहिले असेल. अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी हाती घेतलेल्या उपायांबाबत मी नियमितपणे बोलतही आहे.’’

शॉ यांनी गुरुवारी सकाळी केलेली मूळ ट्विपणी ही बुधवारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या ई-सिगारेटवरील बंदीच्या निर्णयाला अनुसरून, अर्थमंत्र्यांवर निशाणा साधणारी होती. त्या म्हणाल्या, ‘‘ई-सिगारेटवर बंदी आणल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या. हा निर्णय आरोग्यमंत्र्यांमार्फत येऊ शकला नसता काय? मग गुटख्यावर बंदी घालण्याचे काय? अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी काही वित्तीय उपाययोजना जाहीर करण्याचे काय?’’

सीतारामन यांनी सत्वर खुलासा करताना, त्यांनी मंत्रिस्तरीय गटाच्या प्रमुख या नात्याने ई-सिगारेट बंदीच्या निर्णयाची घोषणा केल्याचे ट्विपणीद्वारे सांगितले. बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच तसे स्पष्ट केल्याचे त्या म्हणाल्या. शिवाय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन हे आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी देशाबाहेर गेले असल्याचे त्या समयी नमूद केले होते, असेही त्यांनी सांगितले.

ट्विपणीच्या तिसऱ्या भागात सीतारामन यांनी, अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी सुरू असलेल्या कामाचा आणि तीन टप्प्यांमध्ये घोषित उपाययोजनांची माहिती दिली.

त्या पश्चात किरण-मुझुमदार शॉ यांनी पुन्हा ट्विपणीद्वारे खुलासा करताना, त्यांच्या परीने वादाचे निवारणही केले. त्या म्हणाल्या, ‘‘प्रसारमाध्यमे लक्षवेधी व खळबळजनक वृत्त आणि मथळ्यासाठी टपूनच बसलेली असतात. हा कोणताही ‘खटका’ किंवा ‘वाक्युद्ध’ नाही. आपल्या अर्थमंत्री या अत्यंत समंजस आणि दृढनिश्चयी व्यक्ती असल्याचे मी मानते. माझ्या ट्विपणीला प्रतिसाद देताना त्यांची परिपक्वता दिसली आहे. अर्थव्यवस्थेसंबंधी त्यांनी केलेल्या आश्वासक विधानांची मी दखल घेते.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2019 3:44 am

Web Title: twitter spat between finance minister and kiran mazumdar shaw zws 70
Next Stories
1 पुन्हा जबर विक्रीमारा
2 ‘ईपीएफ’वर ८.६५ टक्के व्याजदरावर शिक्कामोर्तब
3 ‘जीएसटी परिषदे’ची आज ३७ वी बैठक
Just Now!
X