ऐन महिनाअखेरच्या आंदोलनामुळे धनादेश वटणावळ, वेतनवितरण सुरळीत होण्यास आठवडा लागणार

मुंबई : बँक व्यवस्थापन संघटनेच्या २ टक्के वेतनवाढीच्या प्रस्तावाविरुद्ध बँक कर्मचारी, अधिकाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला दुसऱ्या व अखेरच्या दिवशीही उत्तम प्रतिसाद मिळाला. मात्र ऐन महिनाअखेरच्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे आता धनादेश वटणे, मे महिन्याचे वेतन वितरित होणे याकरिता आठवडा लागण्याची शक्यता आहे.

‘इंडियन बँक्स असोसिएशन’ने प्रस्तावित केलेल्या २ टक्के वेतनवाढीविरोधात ‘यूनायटेड फोरम ऑफ बँकिंग यूनियन्स’च्या नेतृत्वाखाली अधिकतर सरकारी बँक कर्मचारी दोन दिवसांच्या संपात सहभागी झाले. परिणामी दुसऱ्या दिवशीही बँक शाखांमधील व्यवहार बंद होते. तर अनेक एटीएमही रिकामे झाले. गुरुवारी संप संपला असला तरी त्याचे पडसाद येत्या काही कालावधीत उमटणार आहेत. यानुसार कोटय़वधी कर्मचाऱ्यांचे मे महिन्याचे वेतन रखण्याची चिन्हे आहे. तर २१ लाख कोटी रुपयांचे ४० लाखांहून अधिक धनादेश वटण्यासही विलंब लागण्याची शक्यता आहे.

दोन दिवसांच्या बँक संपामुळे २१ सरकारी बँकांच्या ८५,००० हून अधिक शाखा बंद होत्या. तर त्याहून अधिक एटीएमही आता ठप्प पडले आहेत. शनिवारी बँका पूर्ववत सुरू होणार असल्या तरी रविवारच्या सुटीमुळे व्यवहार विस्कळीत होणार आहेत. ते पूर्वपदावर येण्यास आठवडय़ाचा कालावधी लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

गेल्या दोन दिवसांच्या संपामुळे सामान्य ग्राहक, खातेदारांना त्रास सहन करावे लागल्याबद्दल ‘यूनायटेड फोरम ऑफ बँक यूनियन्स’ महाराष्ट्रचे संघटक देविदास तुळजापूरकर यांनी खंत व्यक्त केली आहे. मात्र आधीच्या १५ टक्के वेतनवाढीच्या तुलनेत २ टक्क्य़ांचा प्रस्ताव संघटनेला मान्य नसून याबाबतची आगामी भूमिका येत्या काही दिवसात निश्चित केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

अन्य वेतनवाढ करारही रखडणार

‘इंडियन बँक्स असोसिएशन’ आणि बँक कर्मचारी, अधिकारी संघटना यांच्यातील वेतनवाढीच्या करार संघर्षांमुळे एलआयसी, जीआयसीतील कर्मचाऱ्यांबरोबरचे त्यांच्या व्यवस्थापनाचे करारही लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नोव्हेंबर २०१७ पासून बँकांना लागू होणाऱ्या वाढीव वेतन कराराचा तिढा सुटत नसल्याने अन्य कर्मचारी संघटनाही त्यांच्या वेतनवाढीचा करार करू शकत नाहीत.

निर्णय घेणारी यंत्रणा तात्पुरती

बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत अंतिम निर्णय घेणारी यंत्रणा तात्पुरती असल्याचा मोठा फटका बसणार आहे. वेतनवाढीकरिता मुख्य चर्चा करणारी बँक व्यवस्थापनाची संघटना असलेल्या ‘इंडियन बँक्स असोसिएशन’च्या अध्यक्षा उषा अनंतसुब्रमण्यन यांचे अधिकार गोठविण्यात आले आहेत. तर अर्थखात्याचा तात्पुरता कार्यभार सध्या केंद्रीय कोळसा, रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे आहे.