संपकरी कर्मचारी संघटनांचा आरोप

मुंबई : आतापर्यंत दोन टप्प्यांत झालेल्या बँक विलीनीकरणामुळे संबंधित बँकांच्या तब्बल तीन हजार शाखा बंद झाल्या असून, सरकारकडून प्रस्तावित १० बँकांच्या विलीनीकरणाने आणखी दोन हजार बँक शाखा बंद होतील, असा आरोप सरकारच्या या धोरणाला विरोध करणाऱ्या बँक संघटनेच्या नेत्यांनी केला आहे. मंगळवारच्या लाक्षणिक बँक संपामुळे महाराष्ट्रातील अनेक बँकांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी बँकांचे कामकाज विस्कळीत झाले.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलीनीकरण विरोधात कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन राष्ट्रीय संघटनांकडून मंगळवारी एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारण्यात आला होता. संपात देशभरातून पाच लाख कर्मचारी तर राज्यातून सुमारे १० हजार शाखांमधील ४० हजार कर्मचारी सामील झाले होते, असा संपकरी ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन (एआयबीईए) आणि बँक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया (बेफी) या संघटनांनी दावा केला. मुंबईत आझाद मैदान येथे बँक संघटनेच्या नेतृत्वाखाली सरकारविरोधात निदर्शने केली. आंदोलनस्थळी दोन हजारांहून अधिक कर्मचारी जमा झाले होते.  यावेळी विलीनीकरणाने मोठय़ा संख्येने बँक शाखा बंद होत असल्याचा आरोप करण्यात आला.

मंगळवारच्या एकदिवसीय देशव्यापी संपात मात्र स्टेट बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, रिझव्‍‌र्ह बँक तसेच क्षेत्रीय ग्रामीण बँक, खासगी व सहकारी बँकांचे कर्मचारी, अधिकारी सहभागी नव्हते. केंद्र सरकारने देशातील विविध १० सरकारी बँकांचे चार बँकांमध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय ऑगस्टमध्ये घेतलेल्या निर्णयाविरोधात यापुढेही विरोधाचा रेटा कायम ठेवण्याचा निर्धार सभेला संबोधित करताना कॉ. सुरेश धोपेश्वरकर यांनी व्यक्त केला.

बँक विलीनीकरणातून मोठय़ा प्रमाणात कर्ज थकविणाऱ्या बडय़ा व्यावसायिकांना झुकते माप दिले जात असल्याचा आरोप बँक संघटनेच्या नेत्यांनी केला. एकीकडे छोटय़ा बँका बंद होत आहेत तर दुसरीकडे नव्या लहान बँकांना (स्मॉल फायनान्स बँक) परवाने दिले जात आहेत, याबाबतही नेत्यांनी रोष व्यक्त केला.