चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या महिन्यात दुचाकी विक्रीने संमिश्र विक्री नोंदवली आहे. यामध्ये मोटरसायकलची विक्री एप्रिल २०१४ च्या तुलनेत कमी झाली आहे. तर याच वर्गवारीतील गिअरलेस स्कूटरची विक्री मात्र गेल्या महिन्यत वार्षिक तुलनेत वाढली आहे.

दुचाकीमध्ये मोटरसायकलची विक्री यंदा घसरली आहे. तर याच गटातील गिअरलेस स्कूटरला यंदाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्याचबरोबर तीन चाकी वाहनांची विक्री यंदाही घसरतीच राहिली आहे.
एप्रिलमध्ये मोटरसायकलची विक्री ८,८१,७५१ झाली आहे. ती गेल्या वर्षांतील याच कालावधीपेक्षा २.७७ टक्क्य़ांनी घसरली आहे. तर एकूण दुचाकी विक्री ०.१६ टक्क्य़ांनी कमी होत १२,८७,०६४ झाली आहे. यंदा सलग सातव्या महिन्यात मोटरसायकल विक्रीचा नकारात्मक प्रवास कायम राहिला आहे.
यामध्ये हीरो मोटोकॉर्पने ५.४४ टक्के घसरण नोंदवित यंदा विक्री ५ लाखांच्या आत राखली होती. कंपनीच्या स्कूटरची विक्री मात्र ५.३८ टक्क्य़ांनी वाढून ३,४४,७५२ झाली होती. टीव्हीएसच्या स्कूटरमध्येही यंदा १४ टक्के वाढ नोंदली गेली.
स्पर्धक होन्डाच्या तुलनेत कंपनीला गेल्या तिमाहीत नफ्यातील घसरणीलाही सामना करावा लागला आहे. तर बजाज ऑटो यंदाही घसरणीतून बाहेर पडू शकली नाही. कंपनीने ३.७८ टक्के घसरण नोंदवित १,६०,५५४ दुचाकी एप्रिलमध्ये विकली. दुचाकी बाजारपेठेत वेगाने वाढणाऱ्या होन्डा कंपनीलाही यंदा घसरण नोंदवावी लागली होती.