अमेरिकेच्या सुरक्षाविषयक इशाऱ्याकडे कानाडोळा

लंडन : सुरक्षेच्या कारणास्तव चिनी दूरसंचार कंपनी हुआवेवर निर्बंध घालण्याचे विविध देशांना आवाहन करणाऱ्या अमेरिकेकडे दुर्लक्ष करत, ब्रिटनने या जलद तंत्रज्ञान पुरवठादार कंपनीसाठी पायघडय़ा घातल्या आहेत.

हुआवेने तिचे ५जी जलद तंत्रज्ञानाचे जाळे आपल्या देशात विस्तारावे यासाठी ब्रिटनने चिनी कंपनीला निमंत्रण दिले आहे. युरोपमध्ये हुआवेच काय पण कोणत्याही कंपनीला अटकाव करण्यात येणार नाही, असे युरोपीय महासंघाच्या अधिकाऱ्याने मंगळवारी ब्रसेल्स येथे सांगितले.

गेल्याच महिन्यात भारताने ५जी तंत्रज्ञानाच्या जाळे विस्तारासाठी होणाऱ्या ध्वनिलहरी लिलावाकरिता सर्व कंपन्यांना आवाहन केले होते. यात हुआवेचा सहभागही अपेक्षित आहे.

ब्रिटनमधील मोबाइल सेवा प्रदात्या कंपन्या हुआवेचे ५जी तंत्रज्ञान वापरू शकतात असे स्पष्ट करताना, मात्र कंपन्यांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असेही ब्रिटनच्या सरकारने नमूद केले आहे. विशेष म्हणजे, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी शुक्रवारीच अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांच्याशी या विषयावर चर्चा केली होती, असे ‘बीबीसी’ने म्हटले आहे.

चीनबरोबर व्यापार युद्धाची स्थिती निर्माण झाल्यानंतर अमेरिकेने तेथील हुआवे कंपनीवर निर्बंध आणतानाच अन्य देशांनीही तिच्या ५जी तंत्रज्ञानाचा अंगिकार करू नये, असे आवाहन केले होते. हुआवेच्या उपकरणांबाबत सुरक्षेच्या कारणास्तव प्रश्नचिन्ह उपस्थित करत अमेरिकेने हे निर्बंध लादले होते. एकूणच हुआवेच्या सर्व उपकरणांचा आपल्या देशात वापर होणार नाही, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले होते.

चिनी कंपनी हुआवेचे संस्थापक रेन झेन्गिफेई हे चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मी तसेच सत्ताधारी पक्ष कम्युनिस्ट पार्टीशी संबंधित असल्याने अद्ययावत तंत्रस्नेही सेवेच्या माध्यमातून हुआवेमार्फत सरकारसाठी हेरगिरी केली जाण्याची भीती अमेरिकेला आहे. म्हणूनच अमेरिकेने ब्रिटनलाही सावध केले होते. आता ब्रिटनच्या ताज्या निर्णयावर ‘आपण निराश झाल्या’चे अमेरिकेची प्रतिक्रिया आहे.