तंत्रज्ञानाधारित अध्यापनाचे व्यासपीठ असलेल्या अनअ‍ॅकॅडमी या नवउद्यमी (स्टार्टअप) उपक्रमाने येत्या डिसेंबरमध्ये २५ ते ३० कोटी रुपये खर्चाचा ‘इसॉप’ पुनर्खरेदीचा कार्यक्रम राबविण्याची गुरुवारी घोषणा केली. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमध्ये मिळकतीतील काही हिस्सा भागधारकांमध्ये विभागून त्यांना खूश करण्यासाठी रुळलेला ‘बायबॅक’चा प्रघात आता, स्टार्टअप्सकडूनही कर्मचाऱ्यांना लाभ पोहचविण्यासाठी वापरात आणला जात आहे.

येत्या १० डिसेंबर २०२० ला विद्यमान तसेच कंपनीबाहेर पडलेल्या माजी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनार्थ प्रदान करण्यात आलेले समभाग आंशिक स्वरूपात पुन्हा खरेदी करण्याची (बायबॅक) योजना अनअ‍ॅकॅडमीने जाहीर केली आहे. कर्मचारी त्यांच्याकडील २५ टक्के आणि १०० टक्के समभाग या योजनेतून कंपनीला परत देऊ शकतील.

स्थापना होऊन अवघी पाच वर्षे झालेल्या या कंपनीने सप्टेंबर २०१९ मध्ये या धाटणीचा पहिला इसॉप पुनर्खरेदीचा कार्यक्रम राबविला होता. आता जाहीर करण्यात आलेल्या पुनर्खरेदी कार्यक्रमाच्या तुलनेत त्याचे प्रमाण एक-दशांश इतके होते. अशा कार्यक्रमातून कंपनीच्या वाढत्या मूल्यांकनाचा प्रत्यक्ष लाभ विद्यमान व माजी कर्मचाऱ्यांपर्यंत पोहचविला जात आहे.

फेसबुक गुंतवणूकदार असलेल्या अनअ‍ॅकॅडमीने गेल्याच महिन्यात, १,१२५ कोटींचा निधी सॉफ्टबॅक, व्हिजन फंड या नव्या गुंतवणूकदारांकडून उभा केला. या नव्या निधी ओघामुळे कंपनीचे मूल्यांकन सुमारे १०,९०० कोटी रुपयांवर पोहोचले आहे.