भारतीय मोबाईलफोन बाजारातील सॅमसंग ही सर्वात मोठी कंपनी केवळ एक रुपया ‘डाऊन पेमेंट’वर ग्राहकांसाठी स्मार्टफोन उपलब्ध करून देणार आहे. त्याचबरोबर ‘कॅश बॅक’ आणि ‘डिस्काऊंट’सारख्या अन्य काही आकर्षक योजनादेखील राबविणार आहे. नव्या योजनेअंतर्गत सॅमसंग गॅलेक्सी एस-६ फोन ३३,९०० रुपयांत खरेदी करता येईल. या फोनची बाजारात दाखल होतानाची किंमत ४९,९०० रुपये इतकी होती. त्याचप्रमाणे गॅलेक्सी नोट ५ हा फोन ४२,९०० रुपयांत मिळणार आहे. या फोनची बाजारात दाखल होतानाची किंमत ५३,९०० इतकी होती. हे दोन्ही फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना कंपनीतर्फे १० टक्के ‘कॅश बॅक’देखील देण्यात येईल. कंपनीचे अन्य फोन गॅलेक्सी ए-७ २९,९००, गॅलेक्सी ए-५ २४,९०० आणि गॅलेक्सी ग्रॅण्ड प्राइम ४जी ८,२५० रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहेत.

कसा घ्याल नव्या योजनेचा लाभ – ग्राहकाला केवळ एक रुपयाच्या डाऊन पेमेंटवर सॅमसंगचा फोन खरेदी करता येईल. त्यानंतर केवळ १२ मासिक हप्त्यांमध्ये ग्राहकाला फोनची उर्वरित रक्कम चुकती करावयाची आहे. मोबाईल फोनच्या काही अन्य योजनांमध्ये ग्राहकाला ‘कॅश बॅक’सारख्या योजनेचा लाभदेखील घेता येईल.

सॅमसंगच्या या उत्पादनांवरदेखील सूट – स्मार्ट फोन व्यतिरिक्त सॅमसंग आपल्या अन्य काही उत्पादनांवरदेखील डिस्काउंट देत आहे. यात यूएचडी फ्लॅट स्मार्ट टीव्ही, फुल एचडी फ्लॅट टीव्हीचा समावेश आहे. याशिवाय एसी, टॅबलेट, मायक्रोवेव्ह ओव्हन आणि रेफ्रिजरेटर या उत्पादनांवरदेखील कंपनीतर्फे डिस्काउंट देण्यात येत आहे. ग्राहकांना या योजनेचा लाभ केवळ १५ मे पर्यंतच घेता येईल.