भांडवली बाजाराच्या इतिहासात प्रथमच पुढच्या शनिवारी व्यवहार होत आहेत. सुटीनिमित्त बाजारात शनिवारी एरव्ही व्यवहार होत नसले तरी यंदा येत्या शनिवारी शेअर बाजार सुरू राहणार आहेत. पंतप्रधान मोदी सरकारचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री पुढील शनिवारी, २८ फेब्रुवारीला संसदेत मांडणार आहेत.
अर्थसंकल्प दिनी बाजारातील व्यवहार सुरू ठेवावेत, अशी सूचना भांडवली बाजार नियामक सेबीने मुंबई, राष्ट्रीयसह अन्य शेअर बाजारांना शुक्रवारी केली. यानुसार शनिवारी सकाळी ९ ते दुपारी ३.३० या वेळेत भांडवली बाजारातील व्यवहार नियमित होतील. एरवी प्रमुख बाजार हे शनिवार व रविवार असे आठवडय़ातील दोन दिवस बंद असतात.
केंद्रीय अर्थराज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी शुक्रवारीच मुंबई-भेटीत याबाबतचे संकेत दिले होते. बाजारातील व्यवहार सुरू ठेवण्यासाठी सरकारकडे मोठय़ा संख्येने सूचना आल्या होत्या, असे नमूद करून मात्र याबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार भांडवली बाजार नियामक सेबीलाच असल्याचेही स्पष्ट केले होते.
मोदी सरकारचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली हे येत्या २८ फेब्रुवारी रोजी मांडणार आहेत. या दिवशी शनिवार आहे. भांडवली बाजारात शनिवार व रविवारी व्यवहार होत नाहीत. दिवाळीत नव्या संवत्सराच्या पहिल्याच दिवशीदेखील बाजार बंद असतो. मात्र लक्ष्मीपूजनानिमित्त बाजारात मर्यादित कालावधीसाठी मुहूर्ताचे विशेषसौदे होत असतात.

आपल्या बाजाराविषयीसंशोधन विदेशात होणे दुर्दैवी : जयंत सिन्हा
सेबी प्रवर्तित राष्ट्रीय रोखे बाजार संस्थेच्या कार्यक्रमानिमित्त मुंबईत आलेल्या जयंत सिन्हा यांनी सांगितले की, भांडवली बाजारांची स्वत:ची अशी बाजारविषयक संशोधन व्यवस्था अधिक सक्षम बनविणे आवश्यक बनले आहे. यासाठी सेबीबरोबर सहकार्याची विविध बाजारांकडून अपेक्षा सिन्हा यांनी या वेळी व्यक्त केली. बाजारांकडे मोठय़ा प्रमाणात व्यवहारविषयक आकडेवारी, माहिती असली तरी त्यांचे विश्लेषण मात्र आजही आपल्याला भारताबाहेरून मिळते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. भांडवली बाजारविषयक संशोधनाचे कार्य भारतातच मोठय़ा प्रमाणात व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्त केली. बाजाराविषयीचे संशोधन सर्वाना प्राप्त व्हावे, असे नमूद करीत देशात रोखे बाजारासाठीची खास अशी राष्ट्रीय संस्था असावी, यावरही त्यांनी या वेळी भर दिला.