नवी दिल्ली : गत वर्षाप्रमाणे यंदा देशभर थैमान सुरू असलेल्या दुसऱ्या करोना लाटेचे अर्थव्यवस्थेला कठोर घाव सोसावे लागणार नाहीत, असा आश्वासक सूर केंद्रीय अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी प्रसिद्धीस दिलेल्या टिपणातून व्यक्त केला.

एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीतील आर्थिक क्रियांवर विपरीत परिणामाच्या शक्यतेची कबुली देताना, अर्थ मंत्रालयाने करोनाच्या दुसऱ्या लाटेचे अर्थव्यवस्थेवरील प्रभाव फार घातक नसतील, असे प्रतिपादन केले आहे.

गेल्या वर्षातील पहिल्या लाटेचा अनुभव गाठीशी आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरून कोविड-१९ शी सामना करण्यासंदर्भात काही चांगले धडे भारताने मिळविले आहेत, त्यामुळे या दुसऱ्या लाटेच्या धडकांना सहजपणे सोसून अर्थव्यवस्था तग धरून राहील, असा विश्वास अर्थमंत्रालयाने प्रसृत केलेल्या टिपणाने व्यक्त केला आहे