दिआज्जिओची ‘बीआयएफआर’ मंडळाकडे धाव

ब्रिटनच्या दिआज्जिओचे वर्चस्वाखाली गेलेल्या युनायटेड स्पिरिट्सची नक्त मालमत्ता सर्वोच्च स्तरावरून मार्च २०१५ अखेरच्या चार वर्षांमध्ये तब्बल ८६ टक्के घसरल्याने नव्या मालक कंपनीने तिला आजारी घोषित करण्यासाठी संबंधित यंत्रणेकडे धाव घेण्याची तयारी सुरू केली आहे. गेल्या आठवडय़ात संसदेने मंजूर केल्या नवीन दिवाळखोरीचा कायद्यान्वये ती ‘दिवाळखोर’ ठरणारी पहिली कंपनीही असू शकेल.

धनको बँकांकडून निर्ढावलेले कर्जदार (विलफुल डिफॉल्टर) म्हणून शिक्का बसलेल्या विजय मल्ल्या यांची पूर्वाश्रमी मालकी असलेल्या या कंपनीने आजारी कंपनी घोषित करण्याकरिता तिच्या भागधारकांसमोर प्रस्ताव ठेवला आहे. कंपनीच्या २२ जानेवारी रोजी होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

आजारी उद्योग कंपनी कायद्यानुसार, गेल्या चार वर्षांतील सर्वोच्च स्तरापासून एखाद्या कंपनीची निव्वळ मालमत्ता ५० टक्क्यांपर्यंत घसरत असेल तर तिला औद्योगिक आणि वित्तीय पुनर्रचना मंडळाकडून (बीआयएफआर) आजारी कंपनी म्हणून परवानगी अनिवार्य आहे.

युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडने ३१ मार्च २०१५ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षांत ५,०४५.४५ कोटी रुपयांचे नुकसान सोसले आहे. हे प्रमाण कंपनीच्या यापूर्वीच्या चार वर्षांतील सर्वोच्च निव्वळ मालमत्तेपेक्षा ५० टक्क्यांहूनही अधिक आहे.

उपकंपन्यांची दीर्घकालीन गुंतवणुकीचे मूल्य कमी लेखल्याने तसेच उपकंपन्यांना मिळालेल्या कर्जाचा कमी उपयोग केल्याने नुकसान वाढल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. कंपनीने सप्टेंबर २०१५ अखेर संपलेल्या सहा महिन्यांत मात्र रोख नफा मिळवल्याचे नमूद केले आहे.