देशाच्या अर्थव्यवस्थेत मंदीचे वातावरण आहे, असे प्रसारमाध्यमांकडून सतत भासविले जात असले, तरी ही भीती सर्वस्वी अनाठायी आहे, असे मत अर्थतज्ज्ञ व नियोजन आयोगाचे सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांनी मुंबईत झालेल्या लिबॉर्ड फाऊंडेशनच्या पुस्तक प्रकाशन समारंभात बोलताना व्यक्त केले.
डॉ. वंदना डांगी यांनी लिहिलेल्या ‘कॉर्पोरेट गव्हर्नन्स: इमìजग इश्यूज’ (इंग्रजी) व ‘भारतीय अर्थव्यवस्था: बदलते स्वरूप’ (हिंदी) या दोन पुस्तकांचे प्रकाशन डॉ. जाधव यांच्या हस्ते प्रकाशन झाले. पुस्तकांची निर्मिती लिबॉर्ड फाऊंडेशन या संस्थेने केली आहे. या कार्यक्रमाला राज्याचे ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, खासदार डी.पी. त्रिपाठी, कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव अतुल अंजान आदी उपस्थित होते.
डॉ. जाधव म्हणाले, सध्या युरोपीय आíथक संकटाचा फटका जगाला बसतो आहे; मात्र भारतीय अर्थव्यवस्थेत त्यामुळे गडबड झालेली नाही. यंदा नियोजन आयोगाने विकासाचे कोणतेही लक्ष्य ठेवलेले नाही, असेही त्यांनी सांगितले; तथापि आर्थिक सुधारणा १०० टक्के राबविल्यास ८.५ टक्के आíथक विकास होऊ शकतो. या सुधारणा ५० टक्के  राबविल्यास ६.५ टक्के विकास होऊ शकतो आणि सुधारणा राबविण्यात दिरंगाई केल्यास जेमतेम पाच टक्के विकास होऊ शकतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. चालू खात्यातील तुटीसंदर्भात जाधव यांनी, ही तूट मुख्यत्वे सोन्याच्या भरमसाट आयातीमुळे होत असल्याचे सांगितले. सोन्याची आयात कमी करण्यासाठी उपाय योजणे हे काम सरकारचे नसून लोकांनीच संयम बाळगून सोने खरेदी कमी करावी, असा सल्लाही त्यांनी दिला.