अर्थमंत्र्यांचे बँकांना आवाहन

वित्तीय पुरवठय़ापासून वंचित राहिलेल्या क्षेत्रात अधिक कार्य करण्याची सूचना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मंगळवारी बँका तसेच वित्तीय संस्थांना केली. असे केल्याने असंघटित क्षेत्रातील रोजगारनिर्मिती वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

नाबार्डतर्फे आयोजित कार्यक्रमात अर्थमंत्री बोलत होते. असंघटित क्षेत्रातील लोकांचे प्रमाण हे संघटित क्षेत्रातील लोकांपेक्षा अधिक असल्याचे नमूद करत जेटली यांनी, मात्र असंघटित क्षेत्रात तुलनेत कमी कर्ज दिले जात असल्याचे नमूद केले.

असंघटित क्षेत्राकरिता असलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून बँका तसेच वित्तीय संस्थांचे संसाधन उपलब्ध झाल्यास या क्षेत्रात अधिक रोजगारनिर्मिती होऊ शकेल, असेही जेटली म्हणाले. यासाठी त्यांनी महिला बचत गटाचे उदाहरण दिले.

ग्रामीण भागातील महिलांना वित्तीय सुरक्षा प्रदान करण्यासाठी स्त्रियांचे नेतृत्व असलेल्या स्वयंसाहाय्यता गटासारखी चळवळ २५ वर्षांपूर्वीच सुरू झाली आणि आज तिचे ८५ लाख लाभार्थी झाले, असेही जेटली यांनी यावेळी सांगितले.