जुलैमधील औद्योगिक उत्पादन दर उंचावून ४.२ टक्के
ग्राहकोपयोगी वस्तू निर्मितीने नोंदविलेल्या दुहेरी आकडय़ातील वाढीच्या जोरावर जुलैमधील औद्योगिक उत्पादन दर उंचावला असून, त्याने आधीच्या महिन्याबरोबरच वार्षिक तुलनेतही वाढ नोंदवली आहे. जुलै २०१५ मध्ये हा दर ४.२ टक्के राहिला आहे. जून २०१५ मध्ये तो ३.८, तर वर्षभरापूर्वी, जुलै २०१४ मध्ये अवघा ०.९ टक्के होता.
अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले देशातील औद्योगिक वाढीचे चित्र स्पष्ट करणारी जुलैमधील आकडेवारी केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने शुक्रवारी सायंकाळी जाहीर केली. औद्योगिक उत्पादन निर्देशांकात भांडवली वस्तू निर्मिती क्षेत्राची कामगिरी दमदार असल्याचे यातून स्पष्ट झाले. तर निर्देशांकात सर्वाधिक ७५ टक्के हिस्सा राखणाऱ्या निर्मिती क्षेत्राची गती ४.७ टक्क्य़ांनी वाढली आहे.
एप्रिल ते जुलै या चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या चार महिन्यांतील औद्योगिक उत्पादन दर ३.५ टक्के राहिला आहे. वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीदरम्यान असलेल्या ३.६ टक्क्य़ांच्या तुलनेत तो यंदा किरकोळ घसरला आहे. आधीच्या महिन्यात तसेच वर्षभरापूर्वी कालावधीपेक्षा यंदा निर्देशांकाची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे.
वर्षभरापूर्वी नकारात्मक ३ टक्के दर नोंदविलेल्या भांडवली वस्तू क्षेत्राचे उत्पादन यंदाच्या जुलैमध्ये १०.६ टक्क्य़ांनी वाढले आहे. याचबरोबर विद्युत उपकरण निर्मितीही ११.४ टक्क्य़ांवर गेली आहे, तर ग्राहकोपयोगी वस्तू निर्मिती क्षेत्र १.३ टक्क्य़ांनी विस्तारले आहे.
तर खनिकर्म क्षेत्राची वाढ १.३ टक्क्य़ांची आहे. जुलै २०१४ मध्ये ती ०.१ टक्के होती. यंदा ऊर्जा निर्मितीही कमी होत ३.५ टक्के झाली आहे. वर्षभरापूर्वी ती ११.४ टक्के होती.
चालू खात्यावरील तूट सावरली
चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत देशाच्या चालू खात्यावरील तूट सावरून ६.२ अब्ज डॉलर झाली आहे. सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या प्रमाणात ती १.२ टक्के नोंदली गेली आहे. वर्षभरापूर्वी, एप्रिल ते जून २०१४ दरम्यान तूट ७.८ अब्ज डॉलर म्हणजेच देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत १.६ टक्के होती. गेल्या तिमाहीत व्यापार तुटीत (३४.२ अब्ज डॉलर) आलेल्या सुधारामुळे वित्तीय तूट कमी झाल्याचा दावा रिझव्‍‌र्ह बँकेने केला आहे.