निश्चलनीकरणाचा निर्णय विचारपूर्वकच- गव्हर्नर

निश्चलनीकरणातून चलनातून बाद करण्यात आलेल्या ५००-१००० रुपये मूल्याच्या १४.५ लाख कोटी रुपयांच्या नोटांपैकी ११.८५ लाख कोटी रुपये आजवर बँकांकडे जमा झाले असल्याची माहिती रिझव्‍‌र्ह बँकेने बुधवारी दिली. म्हणजे बाद नोटांपैकी जवळपास ८० टक्के नोटा बँकांकडे परत आल्या असून, ३० डिसेंबपर्यंत जुन्या नोटा बँकांकडे जमा करता येणार आहेत.

निश्चलनीकरणानंतरचे पहिले पतधोरण जाहीर करताना रिझव्‍‌र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर आर. गांधी यांनी बाद एकूण नोटांपैकी ८० टक्के नोटा विविध बँकांकडे जमा झाल्याचे सांगितले. तर बँकांमार्फत नव्या नोटांचा पुरवठा सुरळीत असून आतापर्यंत ४ लाख कोटी रुपये खातेदारांना वितरित करण्यात आल्याचे ते म्हणाले.

रिझव्‍‌र्ह बँकेमार्फत बँकांना आतापर्यंत पुरविण्यात आलेल्या नोटांची संख्या सुमारे १९०० कोटी असल्याचे नमूद करून गांधी यांनी ही गेल्या तीन वर्षांत पुरविलेल्या एकूण नोटांपेक्षाही अधिक असल्याचा दावाही केला.

काळा पैशाला पायबंद तसेच बनावट नोटा आणि दहशतवादाची आर्थिक रसद बंद करण्यासाठी चलनातून जुन्या ५०० व १,००० रुपयांच्या नोटा बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय घाईघाईने नव्हे तर पूर्ण विचारांतीच घेतला गेला, असे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले. निश्चलनीकरणाच्या परिणामांची प्रतीक्षा करणे आवश्यक असल्यानेच तूर्त व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, अशा शब्दांत गव्हर्नर पटेल यांनी आपल्या बुधवारच्या पतधोरणाचे समर्थन केले.

तथापि निश्चलनीकरणाच्या फायदे-तोटय़ांबाबत त्यांचे विश्लेषण काय अशा प्रश्नाला उत्तर देताना, तात्पुरता परिणाम सामान्यजनांना त्रासाचा वअर्थव्यवस्थेवर ताण आणणारा दिसत असला तरी दीर्घ मुदतीत याचे अनेक फायदे असल्याचे सांगितले.

चलनाबाबतची स्थिती पूर्वपदावर येताच रक्कम काढून घेण्याबाबत बँक ग्राहक, खातेदार यांना असलेली मर्यादा शिथिल केली जाईल, असेही  सर्वसामान्यांना आश्वस्त करणारे प्रतिपादन या वेळी रिझव्‍‌र्ह बँकेने केले.

१,००० रुपयांच्या नोटा पुन्हा चलनात आणण्याबाबत अद्याप कोणताही विचार नसल्याचेही स्पष्ट करतानाच २,००० रुपयाच्या नव्या नोटांचे पुरवठा प्रमाण वाढविण्यात येईल, असेही गांधी यांनी या वेळी सांगितले.

नव्या चलनाचा अर्थव्यवस्थेत पुरवठा कायम राहणार असल्याचेही सांगण्यात आले. नव्या चलनांचा पुरवठा योग्यरीतीने सुरू असून लोकांनी नोटा साठवून ठेवण्याऐवजी तो चलनात आणावा, असे आवाहन गांधी यांनी केले.

गेल्या दोन आठवडय़ांपासून नव्या ५०० व १०० रुपयांच्या नोटांकरिता छपाई यंत्रांत अद्ययावत बदल करण्यात आले आहेत; निश्चलनीकरणाविषयीची सर्व प्रक्रिया सुरळीतपणे पार पडत असून याबाबतची स्थिती पूर्वपदावर येण्यास काही दिवसांचा कालावधी लागेल, असे पटेल यांनी या वेळी सांगितले.

निश्चलनीकरणामुळे किरकोळ विक्री, आदरातिथ्य, वाहतूक अशा काही क्षेत्रांवर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त करत गव्हर्नरांनी येत्या काही दिवसांकरिता हा परिणाम राहण्याची शक्यता असल्याचे नमूद केले. या क्षेत्रात सध्या रोखीने अधिक प्रमाणात व्यवहार होतात, असे ते म्हणाले.