दलाल स्ट्रीटच्या आकर्षणात वाढीला उपकारक!

नवी दिल्ली : संपूर्ण २०१९ सालात व्याजदरात वाढीला कोणताही वाव दिसून येत नसल्याचे सूचित करीत, अमेरिकेची मध्यवर्ती बँक- फेडरल रिझव्‍‌र्हने मागील तीन वर्षांपासून सुरू केलेल्या पतधोरणात कठोरतेच्या पावित्र्याला अकस्मात मुरड घातली. तथापि फेडचे हे नवे वळण भारतीय भांडवल बाजारात विदेशी गुंतवणुकीचा ओघ गतिमान करण्याच्या दिशेने उपकारक ठरणार आहे.

संपूर्ण २०१९ सालासाठी व्याजदर वाढीला विराम हे ‘फेड’ने यापूर्वी व्यक्त केलेल्या किमान दोनदा वाढीच्या भाकिताच्या पूर्ण विपरीत आहे. अर्थव्यवस्थेचे मंदावलेपण पाहता विश्लेषकांच्या मते, २०१९ सालात प्रत्यक्ष व्याजदर कपातही केली जाऊ शकेल.

फेडच्या दरनिश्चिती समितीच्या दोन दिवसांच्या बैठकीनंतर, या निर्णयाची गुरुवारी फेडचे अध्यक्ष जेरॉम पॉवेल यांनी पत्रकार परिषदेत घोषणा केली. पॉवेल यांनी बेरोजगारी आणि चलनवाढीसंबंधी भाकितेही व्याजदरात वाढीसाठी अनुकूल नसल्याचे स्पष्ट केले.

वर्ष २००७ ते २००९ दरम्यान वित्तीय अरिष्ट आणि त्या पाठोपाठ आलेली महामंदीच्या पाश्र्वभूमीवर फेडरल रिझव्‍‌र्हने व्याजाचे दर जवळपास शून्यवत राखले होते. २०१५ सालाच्या उत्तरार्धात पहिल्यांदा तिने व्याजदरात वाढ केले. परंतु आता हे दर २.२५ टक्के ते २.५० टक्के या दरम्यान वर्षभर तरी थिजलेले राहतील, अशीच शक्यता आहे.

भारतीय बाजारांत गुंतवणूक वाढणार

डिसेंबर २०१८ मध्ये केल्या गेलेल्या दोनदा वाढीच्या विपरीत चालू वर्षांत शून्य व्याजदर वाढीचे फेडचे ताजे संकेत, हे निश्चित भारतातील भांडवली बाजाराला उभारी देणारे ठरेल, असे कयास आहेत. भारतासह उदयोन्मुख बाजारपेठांकडे विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी गेल्या काही वर्षांत पाठ केली होती, आता या मालमत्तावर्गाचे आकर्षण वाढणार आहे.

रुपयाच्या सशक्तेलाही उपकारक

फेडच्या बुधवारी रात्रीच्या या निर्णयाच्या पाश्र्वभूमीवर, अमेरिकी डॉलरचे विनिमय मूल्य अन्य प्रमुख चलनांच्या तुलनेत विनिमय तीव्र स्वरूपात गडगडले. डॉलरचा ऱ्हास हा रुपयाच्या सशक्तेला अधिकाधिक उपकारक ठरेल. विदेशी गुंतवणुकीचा दमदारपणे ओघ सुरू झाल्यास रुपयाच्या मूल्याला आणखीच बळ मिळेल.