सहारा समूहावर निर्माण झालेले कारवायांचे वादळ शमण्याची चिन्हे दिसत नसून अमेरिकेतील न्यायालयाने तेथील समूहाच्या मालकीच्या दोन हॉटेल मालमत्तांशी संबंधित ३५० दशलक्ष डॉलर्सच्या व्यवहारासंदर्भात कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
सहारा ग्रुपची अमेरिकेमध्ये प्लाझा व ड्रीम डाऊनटाऊन ही दोन हॉटेल्स आहेत. सहारा प्रमुख सुब्रतो रॉय यांच्या सुटकेसाठी ही हॉटेल्स विकण्याचा सहाराची धडपड सुरू आहे. अमेरिकेतील दोन व लंडनमधील ग्रॉसव्हेनर हाऊस या हॉटेलांवरील मालकी हक्कावरून हाँगकाँगच्या जेटीएस ट्रेडिंग लि.सोबत वाद सुरू आहे. जेटीएसने त्याची भागीदार ट्रिनिटी व्हाइट सिटी व्हेंचरच्या मदतीने स्विस बँक यूबीएसकडून या हॉटेल खरेदीसाठी कर्जाची रक्कम उभारली होती. काही कारणांवरून जेटीएसने हा व्यवहार रद्द करण्यासाठी न्यूयॉर्कमधील सर्वोच्च न्यायालयामध्ये ट्रिनिटी, सहारा व यूबीएसवर खटला दाखल केला आहे. आता जेटीएसने ट्रिनिटीला थेट सहाराशी व्यवहार करण्यापासून रोखण्याची मागणी केली आहे. तसेच सहारा व यूबीएसवर करारानुसार आपल्या विश्वस्ताच्या हक्कांचे उल्लंघन करत असल्याचा आरोप केला आहे.
यावर न्यायालयाने सहाराला कारणे दाखवा नोटीस बजावली असून उत्तरासाठी ८ जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. यावर सहारा ग्रुपच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी आपली कंपनी ट्रिनिटीसोबत कोणताही व्यवहार करत नसल्याचे सांगितले.