अमेरिकेच्या एच १ बी व्हिसाची सोडत प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, एकूण २३६००० एच १ बी व्हिसा अर्ज आले आहेत. २०१७ या वर्षांसाठी हे अर्ज असून, १ एप्रिलपासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली होती.

पाच दिवसांतच अर्जाची ठरवून दिलेली मर्यादा संपली. भारतातील माहिती तंत्रज्ञान व्यावसायिक अमेरिकेत मोठय़ा प्रमाणावर जात असतात, त्यामुळे या व्हिसाला आपल्यासाठी खूप महत्त्व असते. कामानंतरही अमेरिकेत राहण्यासाठीच्या व्हिसाची मर्यादा ६५ हजार असताना तिप्पट अर्ज आले आहेत. अमेरिकी नागरिकत्व व स्थलांतर सेवेने २ लाख ३६ हजार अर्ज आल्याचे काल जाहीर केले असून, अर्ज प्रक्रिया सुरू करताच पाच दिवसांत अर्जाची कमाल मर्यादा गाठली गेली. संगणक पद्धतीने या अर्जाची विभागणी करून यशस्वी उमेदवारांची सोडत काढली जाणार आहे. कामानंतरच्या वास्तव्यासाठी असलेल्या व्हिसामधील ६५ हजार उमेदवार यात ठरवले जातील, तर परदेशी विद्यार्थ्यांच्या वीस हजार जागांचा फैसलाही या सोडतीत होत आहे. हे विद्यार्थी विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगत शिक्षणासाठी अमेरिकेत जात असतात. ९ एप्रिलला यूएससीआयएसच्या संगणकीय निवड प्रक्रियेनुसार  अर्जाचे यादृच्छिक पद्धतीने वेगळे गट करण्यात आले. त्यातून यशस्वी उमेदवारांची निवड करण्यात आली. कामानंतरही थांबण्यासाठी लागणाऱ्या व्हिसाची मर्यादा ६५ हजार आहे. त्या उमेदवारांची निवड केल्यानंतर उर्वरित अर्ज फेटाळले जाणार आहेत. त्यात शुल्कही परत दिले जाईल.