सरलेल्या सप्टेंबर महिन्यात वधारलेली निर्यात आणि त्या तुलनेत कमालीची घटलेली आयात यांच्या परिणामी देशाची व्यापार तूट ६.७६ अब्ज अमेरिकी डॉलपर्यंत संकोचली आहे. गेल्या काही महिन्यांत रुपयाच्या मूल्यातील वाजवीपेक्षा जास्त अस्थिरतेला काबूत आणण्याच्या दृष्टीने ही बाब सकारात्मक ठरणार आहे.
ऑगस्ट २०१३ मधील आयात-निर्यात व्यापार संतुलनात १०.९ अब्ज अमेरिकी डॉलरची तफावत दिसून आली होती. त्या तुलनेत सप्टेंबरमधील ताजे आकडे खूपच दिलासादायक असल्याचे वाणिज्य मंत्रालयाचे सचिव एस. आर. राव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. गेल्या ३० महिन्यांमधील ही सर्वात कमी व्यापार तूट असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी मार्च २०११ मध्ये ३.८ अब्ज डॉलर अशी आयात-निर्यात व्यापारात अत्यल्प तूट दर्शविण्यात आली होती. त्यानंतरचा तुटीचा हा सर्वात सरस आकडा ठरला आहे.
तरी आयातीचेच पारडे जड!
गेल्या वर्षांच्या म्हणजे सप्टेंबर २०१२च्या तुलनेत यंदाच्या सप्टेंबरमध्ये आयातीत १८.१ टक्क्य़ांची भरीव घट तर त्या उलट निर्यातीत ११.१५ टक्क्यांची दमदार वाढ दिसून आली. देशाच्या आयात खात्यावर सर्वाधिक वाटा असणाऱ्या सोने-चांदी आणि कच्चे तेल यांच्या आयातीत सरलेल्या महिन्यात मोठी घट झाली. सोने-चांदीची आयात तब्बल ८० टक्क्यांनी घटून ०.८ अब्ज डॉलरवर उतरली, तर तेल आयातही ६ टक्क्यांनी घटून १३.१९ अब्ज डॉलरवर स्थिरावली. त्याच वेळी औषधी, वस्त्रोद्योग व कृषी मालाच्या निर्यातीत झालेल्या चांगल्या वाढीचा एकूण व्यापार संतुलनावर विधायक परिणाम दिसून आला, असे राव यांनी सांगितले. सप्टेंबरमधील एकूण आयात आणि निर्यातीचे पारडे अनुक्रमे ३४.४ अब्ज डॉलर आणि २७.६८ डॉलर असे होते.
एप्रिल ते सप्टेंबर २०१३ अशा सहामाहीत निर्यात ५.१४ टक्क्यांनी वाढून १५२.१ अब्ज डॉलर तर आयात १.८ टक्क्यांनी घटून २३२.२३ अब्ज डॉलर इतकी राहिली. सरलेल्या सहामाहीसाठी आयात-निर्यात व्यापार तूट ८०.१ अब्ज डॉलर अशी राहिली आहे. तथापि चालू आर्थिक वर्षांसाठी निश्चित केलेले ३२५ अब्ज डॉलर निर्यातीचे लक्ष्य गाठले जाईल, याबद्दल विश्वास व्यक्त करतानाच राव यांनी आगामी काळात अनावश्यक जिनसांच्या आयातीला आणखी कात्री लावण्यात यश येईल असेही नमूद केले. राव म्हणाले की, अभियांत्रिकी सेवा व वस्तूंच्या निर्यातीत सुधार हा आगामी काळासाठी शुभसंकेत आहे. सरलेल्या सप्टेंबर महिन्यात अभियांत्रिकी निर्यातीत १५.२ टक्क्यांची भरीव वाढ दिसून आली. एप्रिल ते सप्टेंबर अशा सहा महिन्यांमध्ये त्यात ०.६२ टक्क्यांची घट दिसली आहे. रत्न व आभूषण निर्यातीत उभारी दिसून येण्याबद्दल राव आशावादी दिसले.