‘यूएसएड’कडून ७० कोटींची पतहमी

मुंबई : गेल्या काही वर्षांच्या चाचणीनंतर, गृहवित्त क्षेत्रातील प्रमुख कंपनी डीएचएफएलने आरोग्यनिगा सुविधांची उभारणी आणि वैद्यकीय उपकरणांसाठी कर्ज वितरण सुरू करीत असल्याची घोषणा केली आहे.

देशात सर्वत्र वेगाने शहरीकरण सुरू असून, अपुऱ्या आरोग्यनिगा सुविधांच्या अभावी अनारोग्य आणि बकाळीही वाढत आहे. या पाश्र्वभूमीवर, रोगनिदानापासून ते प्रत्यक्ष उपचारांपर्यंत आरोग्यनिगा सुविधांचा विस्तारित विकास व्हावा या उद्देशाने आरोग्य सेवा क्षेत्राला सुलभ वित्तपुरवठय़ाचा स्रोत खुला करण्याबाबत गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या कल्पनेला मूर्तरूप मिळत असल्याचे डीएचएफएलचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी हर्षिल मेहता यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

‘यूएसएड’ या अमेरिकी विकास संस्थेने या कामी आरोग्यसेवा क्षेत्रात कार्यरत लघू आणि मध्यम उद्योजकांसाठी सुमारे ७० कोटी रुपयांची (१० दशलक्ष डॉलर) पतहमी खुली करून हे कर्ज वितरण डीएचएफएलच्या माध्यमातून वितरित करणारा करार मंगळवारी करून कंपनीसाठी नवीन व्यवसाय दालन खुले केले आहे. मुख्यत: महानगरांबाहेरील छोटय़ा शहरातील महिला उद्योजकांना यातून अर्थपुरवठय़ाच्या उपलब्धतेबाबत दरी कमी होऊन, वाणिज्य बँकांच्या तुलनेत सुलभतेने आणि आकर्षक व्याजदरात कर्जपुरवठा देण्याचे उद्दिष्ट असल्याचे मेहता यांनी सांगितले. गत वर्षभरात जवळपास ३,५०० हून अधिक छोटय़ा व्यावसायिकांना वैद्यकीय उपकरणांसाठी कंपनीने छोटी-मोठी कर्जे वितरितही केली असून, त्यात सोनोग्राफी, एमआरआय स्कॅनर मशीन वगैरेंचा समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यातून परिसरातील समाजाला परवडणाऱ्या दरातील आरोग्य सेवा उपलब्ध होईल आणि या क्षेत्रात आलेल्या नव्या छोटय़ा व्यावसायिकांना अपेक्षित व्यवसाय आणि मिळकतही मिळेल, यासाठी या भागीदारीत ‘पहल’सारख्या स्वयंसेवी उपक्रमानेही सहभाग घेतला आहे.