तीन दशकापासून सल्लागार आणि अभियंता सेवा क्षेत्रात कार्यरत पुणेस्थित मिटकॉन कन्सल्टन्सी अ‍ॅण्ड इंजिनीयरिंग सव्‍‌र्हिसेस लिमिटेड (मिटकॉन) या कंपनीने, आपल्या भांडवली समभागांच्या खुल्या प्रारंभिक विक्रीसाठी मसुदा प्रस्ताव दाखल केला आहे. व्यावसायिकरित्या चालविल्या जाणाऱ्या आणि नफाक्षम कंपनीने आपले समभाग राष्ट्रीय शेअर बाजाराने लघु व मध्यम उद्योगांसाठी उपलब्ध केलेल्या ‘एनएसई इमर्ज’ या मंचावर सूचिबद्ध करण्याचे प्रस्तावित केले आहे. या स्थिर किंमतीच्या प्रारंभिक भागविक्रीतून प्रति समभाग ६१ रुपयांप्रमाणे एकूण २५.०१ कोटी रुपयांचे भांडवल उभारले जाणे अपेक्षित आहे जे कंपनीच्या भागविक्रीपश्चात भागभांडवलाचा ३३.८८% हिस्सा व्यापेल. भागविक्रीद्वारे उभ्या राहणाऱ्या भांडवलाचा विनियोग मिटकॉनकडून विस्तारीकरणासाठी केला जाणार आहे. ज्यात बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, नवी दिल्ली आणि अहमदाबाद येथे नवीन कार्यालयांसाठी मालमत्तेचे संपादन करणे आणि बंगळुरू आणि अहमदाबाद येथे पर्यावरणीय परीक्षण प्रयोगशाळांची स्थापना करण्याचे प्रस्तावित आहे.
अमेरिकेत उच्च शिक्षण-इच्छुक विद्यार्थ्यांना मदतीचा हात
अभ्यासात अत्यंत हुशार परंतु अमेरिकेत जाऊन उच्च शिक्षण घेण्याची कुटुंबाची ऐपत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी नमस्ते अमेरिका, अमेरिकन अ‍ॅलम्नी असोसिएशन (ट्रिपल ए) आणि मुंबईस्थित सेंट अ‍ॅन्जेलोज प्रोफेशन एज्युकेशन सपोर्ट या संस्थांनी एकत्र येत एक स्तुत्य उपक्रम आखला आहे. ट्रिपल ए या अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये शिकलेल्या आणि उद्योगक्षेत्रात यशाचे शिखर सर करणाऱ्या व्यावसायिक व नामवंतांकडून स्थापित धर्मादाय संस्था असून, गेल्या ३२ वर्षांत तिने ३५० हून अधिक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी निधी संकलनात भरघोस सहाय्य केले आहे. सेंट अ‍ॅन्जेलोज्चे अध्यक्ष राजेश अथायडे यांनी आर्थिकदृष्टय़ा दुर्बल समाजघटकातील विद्यार्थ्यांना त्यांची शैक्षणिक स्वप्ने साकारण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम प्रयत्न करेल. ज्या विद्यार्थ्यांना अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळविला आहे, पण पैशांची अडचणीमुळे प्रवेश घेता येत नाही अशा विद्यार्थ्यांना मदतीसाठी प्राधान्याने विचार केला जाईल.
परगावांत एजंट व भरमसाठ दलालीविना घर मिळवा!
परगावात राहण्याची जागा मिळविणे ही तरुण विद्यार्थी किंवा व्यावसायिक यांच्यासाठी सर्वात मोठी समस्या बनली आहे. शिवाय घर भाडय़ाने देणे हा फक्त आर्थिक निर्णय नसून सामाजिक निर्णयदेखील आहे. त्यामुळे अलीकडच्या काही घटना पाहता घरमालकांसाठीही सुस्वभावी, सुसंस्कृत भाडेकरू मिळविणे डोकेदुखी बनली आहे. या दोहोंच्या गरज लक्षात घेऊन पंखुरी श्रीवास्तव आणि प्रतीक शुक्ला या तरुणांनी ‘ग्रॅबहाऊस’ ((www.GrabHouse.com)) नावाचे पोर्टल सुरू केले असून, जे एजंटविना घरबसल्या मोबाईल अ‍ॅप व इंटरनेटच्या माध्यमातून भाडेकरू व घरमालक दोहोंच्या गरजा पूर्ण करते. केवळ उपलब्ध जागांची यादी न देता, सर्व बाबी स्वत: पडताळून पुढे घरमालक अथवा भाडेकरू यांना मन:स्ताप सहन करावा लागणार नाही याची दखल घेतली जाते, असे सहसंस्थापक प्रतीक शुक्ला यांनी सांगितले. प्रामुख्याने २०-२८ वयोगटातील तरुणांसाठी स्वतंत्र, पेईंग गेस्ट धाटणीची जागा शोधण्याला अग्रक्रम देत पुढील दोन महिन्यांत देशातील प्रमुख १० शहरांमध्ये सेवा सुरू करण्याचा ‘ग्रॅबहाऊस’चा मानस आहे.