उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मंगळवारी रात्री दोन दिवसीय मुंबईच्या दौऱ्यावर आले. मुंबईत आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमार याची भेट घेतली. त्यानंतर आज योगी आदित्यनाथ यांनी मुंबई शेअर बाजाराला भेट दिली. ते मुंबईत लखनौ म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या (LMC) लिस्टिंग कार्यक्रमात सहभागी झाले होते.

“उत्तर प्रदेशला समृद्ध बनवणं हे एकच ध्येय आहे,” असं ट्वीट योगी आदित्यनाथ यांनी केलं. लखनौ महापालिका हे बॉन्ड जारी करणारी पहिली महापालिका बनली आहे. बुधवारी मुंबई शेअर बाजारात लखनौ म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या बॉन्डचं लिस्टिंग करण्यात आलं. या बॉन्डच्या माध्यमातून जमवण्यात येणारी रक्कम लखनौमध्ये पायाभूत सुविधांच्या कामावर खर्च करण्यात येणार आहे.

नुकतेच लखनौ महापालिकेनं सुशोभिकरण, साफसफाई आणि अन्य कामांसाठी २०० कोटी रूपयांचे बॉन्ड्स जारी केले होते. करोनाचा प्रादुर्भाव असतानाही त्याला २२५ टक्के सबस्क्रीप्शन मिळालं. हाच बॉन्ड बुधवारी मुंबई शेअर बाजारात लिस्ट करण्यात आला.