आयसीआयसीआय प्रु. मिड कॅप फंडाकडून ८६ टक्के परतावा

मुंबई : गत एका वर्षात म्युच्युअल फंडाच्या मिड कॅप योजनांनी गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळवून दिला आहे. देशातील अव्वल पाच म्युच्युअल फंड घराण्यांच्या मिड कॅप योजनांनी गेल्या वर्षात ७० टक्क्यांहून अधिकचा लाभ मिळवून दिला आहे. यात आयसीआयसीआय प्रुडेन्शियलने सर्वाधिक ८६ टक्के परतावा दिला आहे.

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मिड कॅप फंडाचे निधी व्यवस्थापक प्रकाश गौरव म्हणाले, मिड कॅप क्षेत्राची दीर्घावधीतील कामगिरी नेहमीच उत्कृष्ट राहिली आहे. शिवाय गेल्या १० वर्षांत सुमारे ३४ मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांनी इतकी प्रगती केली त्या लार्ज कॅप वर्गात आल्या आहेत.

आघाडीच्या मिड कॅप फंडांच्या परताव्यानुरूप अर्थलाभ डॉटकॉमद्वारे संकलित आकडेवारीनुसार, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मिड कॅपने एका वर्षात ८६.१८ टक्के परतावा दिला आहे. तर निप्पॉन इंडिया ग्रोथ फंडाने ७४.१६ टक्के, अ‍ॅक्सिस मिड कॅप फंडाने ५७.६२ टक्के, कोटक इमर्जिंग इक्विटी फंडाने ७९.८६ टक्के, डीएसपी मिड कॅप फंडाने ५७.४० टक्के आणि एचडीएफसी मिड कॅप अपॉच्र्युनिटीज फंडाने ७५.१९ टक्के परतावा दिला आहे.

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मिड कॅप फंड १० वर्षांपूर्वी सुरू करण्यात आला असून, या काळात सातत्यपूर्ण कामगिरी हे या फंडाचे वैशिष्ट्य राहिले आहे. फंडाच्या निधी व्यवस्थापकांना १८ वर्षांचा फंड व्यवस्थापनाचा दीर्घ अनुभव आहे. मिड कॅप पोर्टफोलिओची गुंतवणूक मौल्यवान आणि संभाव्य वाढ असणाऱ्या समभागांत केली जाते.

सध्या फंडाच्या पोर्टफोलिओने आर्थिक आणि आरोग्यसेवेवर लक्ष केंद्रित केले आहे. विशेषत: स्पेशालिटी केमिकल्स, आरोग्यनिगा व औषधी यांसारख्या क्षेत्रांचा यात समावेश आहे. या क्षेत्रात चिनी कंपन्यांवर बंदी घातली जात असल्याने भारतातील कंपन्यांचा फायदा होऊ शकतो. आरोग्यनिगा व औषध निर्माण क्षेत्राला करोना स्थितीचाही मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. यामुळे आरोग्यसेवांची मागणी वाढली आहे.

विश्लेषकांच्या मते, येणाऱ्या काळात मिड कॅप हा एक चांगला पर्याय असल्याचे आढळून येते.  सरकारने केलेल्या रचनात्मक सुधारणांचा फायदा मिड कॅप क्षेत्रातील कंपन्यांना होईल. तसेच, कमी व्याजदर मध्यम आकाराच्या भांडवल हवे असणाऱ्या कंपन्यांसाठी अधिक उपयुक्त ठरतात. काही कंपन्या आणि उद्योग क्षेत्र हे केवळ मिड कॅप कंपन्यांनीच तारले असल्याचे प्रकाश गौरव यांनी सांगितले. जसे डायग्नोस्टिक, आतिथ्य किंवा हॉटेल यांसारख्या कंपन्या बहुधा मध्यम आकाराच्याच असतात. त्यांच्या मते, यापैकी बहुतेक कंपन्यांचा बाजारातील हिस्सा वाढण्याची शक्यता असते.