ग्राहकोपयोगी वस्तू निर्मितीत आघाडीवर असणाऱ्या व्ही-गार्ड इंडस्ट्रीज लिमिटेडने व्यवसाय विस्ताराच्या दृष्टीने आता महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी एकूण व्यवसायापैकी ७० टक्के व्यवसाय दक्षिणेतून मिळविणाऱ्या या कंपनीने आता एकूणच पश्चिम भारताकडे आपली नजर फिरविली आहे. यासाठी दोन कोटी रुपयांची गुंतवणूक योजनाही कंपनीने आखली आहे.
पेबल वॉटर हिटरच्या नव्या श्रेणीसह कंपनीने महाराष्ट्रात पाऊल ठेवले आहे. जलद गतीने वाढणाऱ्या राज्यातील या क्षेत्राच्या बाजारपेठेत स्थान बळकट करण्याचा याद्वारे प्रयत्न केला गेला आहे. १० वर्षे वॉरण्टी असलेल्या कंपनीच्या विविध उत्पादनांची किंमत ११ हजार रुपयांपर्यंत आहे.
भारतातील ब्रँडेड इलेक्ट्रिकल वॉटर हिटरची बाजारपेठ ८०० कोटी रुपयांची असून, यात महाराष्ट्र १०० कोटी रुपयांचा हिस्सा राखते. असंघटित क्षेत्राचा वाटा ४५ कोटी रुपयांचा आहे. भारतातील इलेक्ट्रिक वॉटर हिटरच्या बाजारपेठेत दर वर्षांला १५ ते २० टक्के दराने वाढ होते आहे, तर व्ही-गार्डच्या महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर आणि पुणे या तीन शहरांमध्ये पुरवठा शृंखला आहेत आणि १० वितरकांच्या माध्यमातून १९६ थेट विक्रेत्यांचे जाळे आहे. कंपनी महाराष्ट्रातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, कोल्हापूर, सांगली, औरंगाबाद, सोलापूर, नाशिक, जळगाव, धुळे, कोकण भाग, नागपूर, अकोला, नांदेड, बुलढाणा, अमरावती या शहरांवर लक्ष केंद्रित करणार आहे.
कंपनीच्या विपणन विभागाचे उपाध्यक्ष दीपक ऑगस्टीन यांनी सांगितले की, इलेक्ट्रिक वॉटर हिटर्सची बाजारपेठ जलदगतीने विस्तारत असलेल्या महाराष्ट्रात वॉटर हिटर्सची पेबल श्रेणी दाखल करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. भारतातील ब्रँडेड इलेक्ट्रिकल वॉटर हिटरच्या बाजारपेठेमध्ये महाराष्ट्राचा वाटा सिंहाचा असून, गृहनिर्माण प्रकल्प, निवासी प्रकल्पांची संख्या वाढत असल्याने ब्रँडेड इलेक्ट्रिकल वॉटर हिटरच्या बाजारपेठेचा जलद गतीने विस्तार होत आहे आणि विजेचा पुरवठा विनाअडथळा होत असल्यास ग्राहकांचा कल विश्वासार्ह ब्रँडची निवड करण्याकडे आहे. सध्या महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्य़ांमध्ये व्ही-गार्ड वॉटर हिटर्स उपलब्ध आहेत. लवकरच राज्यातील अस्तित्व वाढवून बाजारपेठेतील स्थान बळकट करण्याचा मानस असल्याचे ते म्हणाले.