दिल्लीस्थित डिपार्टमेंटल स्टोअर्सची शृंखला असलेल्या व्ही-मार्ट रिटेल लिमिटेडने आपल्या देशव्यापी विस्ताराचे नियोजन म्हणून प्रस्तावित केलेल्या प्रारंभिक खुली भागविक्रीला शुक्रवारपासून सुरूवात होत आहे. प्रति समभाग रु. १९५ ते रु. २१५ या दरम्यान ही भागविक्री मंगळवार ५ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहील. प्रत्यक्षात भागविक्री सुरू होण्याआधीच सुकाणू गुंतवणूकदार संस्थांनी कंपनीच्या पावणे सात लाख समभागांची रु. १४.१६ कोटींना खरेदी केली आहे.
 ‘व्ही-मार्ट’ने देशभरात ६० नवीन स्टोअर्स आणि वितरण केंद्रांची उभारणी तसेच खेळत्या भांडवलाची गरज म्हणून १२६ कोटींचे भांडवल भागविक्रीतून उभे करण्याचा मानस स्पष्ट केला आहे. प्रस्तावित विस्तारानंतर व्ही-मार्टच्या देशभरातील स्टोअर्सची संख्या मार्च २०१५ पर्यंत १२९ वर जाईल.
नव्याने उभे राहणारे स्टोअर्स हे भाडेतत्त्वावर, प्रामुख्याने उत्तर व पश्चिम भारतात दुय्यम व तिसऱ्या श्रेणीच्या शहरात तसेच पूर्णपणे कंपनीद्वारेच चालविले जातील, असे व्ही-मार्ट रिटेल लि.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ललित अगरवाल यांनी स्पष्ट केले.
आयडीएफसी प्रीमियर इक्विटी फंड आणि मॉर्गन स्टॅन्ले म्युच्युअल फंड या सुकाणू गुंतवणूक (अँकर इन्व्हेस्टर) संस्थांनी प्रति समभाग रु. २१० या दराने १४.१६ कोटींच्या समभागांची खरेदी करून या भागविक्रीचा कल स्पष्ट केला आहे. व्ही-मार्टने या आधी गेल्या आठवडय़ात भागविक्री -पूर्व प्रति समभाग रु. २१० या किमतीला १२.५ लाख समभागांची निवडक गुंतवणूकदार संस्थांना विक्री करून रु. २६.२५ कोटींचा निधी उभारला आहे, असे अगरवाल यांनी सांगितले. हे साडेबारा लाख समभाग अँटिक फिनसेक, अँटिक स्टॉक ब्रोकिंग, फोअर डायमेंशन सिक्युरिटीज् (इंडिया), लता मानेक भन्साळी, मेरिट क्रेडिट कॉर्पोरेशन आणि तेजल रोहित कोठारी आदी गुंतवणूकदारांनी खरेदी केले आहेत.