मकरंद जोशी

आपण मागील लेखात पाहिलं की उद्योगांच (भाग भांडवलाचं) मूल्य ही सर्वात मोठी मालमत्ता आहे. कुठल्याही वस्तुचं मूल्य हे त्याच्या ग्राहकांना आकर्षित करण्याच्या क्षमतेनुसार ठरतं.

गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचे गुण उद्योजकाकडे आणि त्याच्या व्यवसायाकडे असतील तर त्याच्या भाग भांडवलाला चांगले मूल्य मिळेल आणि वाढेलही!

हे गुण कोणते ते थोडक्यात या लेखात पाहुया –

आर्थिक सुदृढता : हा खुप मोठा विषय आहे; परंतु खालील मुद्दे उद्योजकाने जरुर तपासावेत. जसे –

* व्यवसायात गुंतविलेल्या पैशांचे नफ्यात रुपांतर करण्याची क्षमता

* केलेल्या उलाढालीतुन (Turnover) नफ्याची क्षमता

* भाग भांडवल व कर्जाचं प्रमाण

* खेळते भांडवल, उलाढालीचं प्रमाण

* केलेल्या खर्चाची नफा करण्याची क्षमता.

वास्तविक पाहता आपण व्यवसाय करताना निर्णय घेताना या बाबी विचारात घेतो का? आपल्या व्यवसायातील निर्णय घेताना असा सल्ला देणारे अनुभवी सल्लागार आपल्याकडे असावेत आणि स्वत:ची आर्थिक साक्षरता सतत वाढवावी.

आपल्या वस्तू/सेवांचा दर्जा आणि त्याची बाजारातली पत :

वरील आर्थिक बाबी या आपण पुरवत असलेल्या वस्तू/सेवांचा दर्जा आणि त्याची बाजारातली पत यावर अवलंबून आहेत. वस्तू/सेवा याच आपला नफा ठरवत असतात. चांगला उद्योजक सतत ग्राहकांचा विचार करून त्यांच्याशी संवाद साधून आपल्या वस्तू/सेवांचा दर्जा आकर्षक ठेवतो.

व्यवसायाची टिकाव धरण्याची क्षमता (sustainability) :

आजच्या काळात बाजारात बदल प्रचंड वेगाने घडत आहेत. वेगवान उद्योग जगतात आपला उद्योग टिकाव धरेल का आणि वाढेल का? गुंतवणूकदारांच्या दृष्टिने ही बाब महत्वाची ठरते.

प्रवर्तकची विश्वासार्हता : कुठलाही निर्णय घेताना हे पहावे की, गुंतवणूकदारांच्या दृष्टिने  खालील परिमाण महत्त्वाचे आहेत –

* कायदेशीर पार्श्वभूमी (Legal Cases)

* कर्जाचा परतावा करण्याची पार्श्वभूमी (CIBIL)

* शैक्षणिक पार्श्वभूमी

* नफा कमावण्याची पार्श्वभूमी

* त्याची बाजारातील पत

उद्योगाची वाठण्याची क्षमता ही उद्योजकावर अवलंबून असते. उद्योजकांनी आपली पत बाजारात उत्तम राहील व वाढेल हे सतत पाहणे आवश्यक आहे.

मनुष्यबळ :

उद्योग एक खांबी तंबु आहे की चांगला संघ (Team) आहे? उद्योजकावर विश्वास ठेवून जर गुणी लोक काम करत असतील तर त्याची विश्वासार्हता वाढते. आपला उद्योग हा गुणी लोकांना आकर्षित करून टिकवण्यासाठी कायम सक्रीय असला पाहिजे.

कंपनीचा कारभार चालवण्याची पद्धत (Corporate Governance):

काही महत्वाचे मुद्दे –

* कायदेशीर बाबींची पुर्तता (उदा. कामगार कायदे, प्राप्तीकर इत्यादी)

* जोखिम घेण्याची आणि ती आवाक्यात ठेवण्याची पद्धत (Risk Mitigation)

* सर्वसमावेशक, दूरगामी परिणामकारक निर्णयाची पद्धती

* स्वतंत्र+विश्वासार्ह संचालक

एक चांगला उद्योजक नेहमीच अशा परिमाणांचं संतुलन साधून आपले बाजारमूल्य वाढवत ठेवतो. हे उद्दीष्ट नसून तो एक प्रवास आहे. कंपनीची परिणामकारकता वाढवण्यासाठी या आणि अशा गोष्टींकडे सातत्याने आणि प्रामाणिकपणे काम करण्यासाठी सर्व उद्योजकांना खुप शुभेच्छा!

(लेखक कंपनी सचिव आहेत.)

makarandjoshi@mmjc.in