इन्फोसिस कंपनीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक विशाल सिक्का यांच्या पत्नी वंदना यांनी अमेरिकेतील इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचे पती विशाल सिक्का यांनी कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या कामकाजातील हस्तक्षेपाला कंटाळून राजीनामा दिला होता.

वंदना सिक्का गेली अडीच वर्षे अमेरिकेतील इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी कार्यरत होत्या. इन्फोसिसची सेवाभावी शाखा असलेल्या या प्रतिष्ठानमार्फत अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवण्यात येतात. पती विशाल यांच्या राजीनाम्यानंतर वंदना यांनीही राजीनामा दिल्याने इन्फोसिसच्या कारभाराबाबतच्या चर्चाना नव्याने उत आला आहे.

वंदना यांनी संगणक अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली असून इन्फोसिसमध्ये रुजू होण्यापूर्वी त्या स्वत:ची स्वतंत्र कंपनी सुरू करण्याच्या बेतात होत्या. मात्र इन्फोसिसचे बोलावणे आल्याने त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली होती. त्यांनी इन्फोसिस फाऊंडेशनच्या कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवून त्यांचा राजीनाम्याचा विचार कळवला आहे. त्यात त्यांनी ही संस्था सोडत असल्या तरी यापुढेही त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातील वाटचाल सुरू ठेवणार असल्याचे म्हटले आहे.