स्टेट बँकेचे प्रक्रिया शुल्क माफ

मंदीपासून अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी बँकांना पुढाकार घेण्याच्या केंद्र सरकारच्या आवाहनाला योग्य तो प्रतिसाद मिळत असून ऐन सण-समारंभाच्या तोंडावर बँकांमार्फत कर्जविषयक सवलतीचा मारा केला आहे. स्टेट बँक, अ‍ॅक्सिस बँक अशा सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्रातील बँकांनी स्वस्त कर्जाचा बार उडविला आहे.

देशातील सर्वात मोठी व्यापारी बँक असलेल्या स्टेट बँकेने कमी व्याजातील गृह, वाहन कर्जासह प्रक्रिया शुल्क तसेच तंत्रस्नेही मंचावरून प्रोत्साहनपूरक व्याजदर देऊ केला आहे. अ‍ॅक्सिस बँकेने तिच्या सर्व गटातील कर्जावरील व्याजदर ०.१० टक्क्याने कमी करत ते किमान ८.५५ टक्के केले आहेत. तर ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सने तिचा गृह तसेच वाहन कर्ज व्याजदर रेपो बँकेशी निगडित करताना ८.३५ ते ८.७० टक्के निश्चित केला आहे.

यंदाच्या सणांच्या हंगामात कारकरिता घेतलेल्या कर्जासाठीचे प्रक्रिया शुल्क माफ करण्यात आले आहे. यासाठी बँकेचा कर्ज व्याजदर वार्षिक ८.७० टक्के आहे. बँकेच्या मोबाइल अ‍ॅप योनोवरून किंवा संकेतस्थळावरून कारसाठी कर्ज घेतल्यास व्याजदरात ०.२५ टक्के सूट देऊ केली आहे. पगारदारांना कारसाठी तिच्या एकूण किमतीपैकी ९० टक्क्यांपर्यंतचे कर्ज मिळेल.

बँकेने तिचा गृह कर्ज व्याजदर नुकताच ०.१५ टक्क्यांनी कमी केला होता. एप्रिल २०१९ पासून बँकेने हे प्रमाण ०.३५ टक्के कमी केले असून बँकेचा सध्याचा गृह कर्ज व्याजदर वार्षिक ८.०५ टक्के आहे. बँकेचा कर्ज व्याजदर रिझव्‍‌र्ह बँकेच्या रेपो दराशी संलग्न करण्यात आला असून तो नव्या कर्जासाठी येत्या १ सप्टेंबरपासून उपलब्ध असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

बँकेचे व्यक्तिगत कर्ज २० लाख रुपयांपर्यंत असून त्याचा वार्षिक व्याजदर १०.७५ टक्के तर परतफेड कालावधी ६ वर्षांचा आहे. पगारदारांना तंत्रस्नेही मंचावरून ५ लाख रुपयांचे पूर्व मंजूर कर्ज उपलब्ध होईल. तर ५० लाख रुपयेपर्यंतच्या शैक्षणिक कर्जासाठीचा व्याजदर ८.२५ टक्के असेल.

व्यापारी बँकांनी त्यांचे कर्ज व्याजदर रेपो दराच्या समकक्ष आणले जावेत, असे आवाहन रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गेल्याच आठवडय़ात केले होते.

मध्यवर्ती बँकेने ऑगस्टच्या सुरुवातीला ०.३५ टक्के रेपो दर कपात करण्यापूर्वी चालू वर्षांत ०.७५ टक्के रेपो दर कमी झाले; मात्र व्यापारी बँकांनी प्रत्यक्षात ०.२९ टक्क्यांपर्यंतच दर कपात केली.

५९ मिनिटांत आता गृह, वाहन कर्जेही

सूक्ष्म व लघुउद्योगांना उपलब्ध करून देण्यात आलेला ‘पीएसबलोन्सइन५९मिनिट्स’ हा मंच आता किरकोळ कर्ज वितरणासाठीही उपलब्ध झाला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँका आता त्यांची गृह, वाहन कर्जाची मंजूरीही आता या संकेतस्थळाद्वारे करतील. स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, कॉर्पोरेशन बँक कमाल पाच कोटी रुपयांपर्यंतची कर्ज या संकेतस्थळाच्या माध्यमातून मंजूर करणार आहेत. हे संकेतस्थळ लघुउद्योजकांना तासाभराच्या आत एक कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यासाठी नोव्हेंबर २०१८ मध्ये सुरू करण्यात आले. याद्वारे मार्च २०१९ अखेर ५०,७०६ कर्ज प्रस्तावांना प्राथमिक मंजुरी, तर २७,८९३ कर्ज प्रस्तावांना अंतिम मंजुरी मिळाली आहे.

नजीकच्या भविष्यात डेबिट कार्ड इतिहासजमा होणार आहेत. आम्हीही येत्या पाच वर्षांत डेबिट कार्डाची संख्या कमी करण्याकडे वाटचाल करीत आहोत. बँकेचे संकेतस्थळ तसेच मोबाइल अ‍ॅप- ‘योनो’द्वारेच ग्राहकांना व्यवहार करता येतील, अशा व्यवस्थेची तयारी सुरू आहे.

रजनीश कुमार, अध्यक्ष, स्टेट बँक